राज्यासह देशाच्या हवामानात (Temperature Rise) गेल्या दोन आठवड्यांपासून मोठा बदल झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात प्रचंड वाढ (Heat Wave) झाली आहे. राज्यात उष्णतेच्या लाटेसह काही भागात पावसाची हवामान खात्याने वर्तवली आहे. वातावरणाच्या खालच्या स्थरातील वाऱ्याची द्रोणीका रेषा ही दक्षिण पुर्व मध्य प्रदेश ते कर्नाटकपर्यंत जात आहे. ही द्रोणीका रेषा विदर्भ आणि मराठवाड्यातून जात असल्याने काल कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता, मराठवाडा ते विदर्भात काल तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर दुसरीकडे मराठवाडा (Marathawada) आणि विदर्भात (Vidarbh) पुढील 24 तासांत अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यता कायम आहे.
Heat Wave उष्णतेची तीव्र लाट आजही कायम राहणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आजही कायम राहणार आहे. आजचे वातावरण कोकणातील काही जिल्ह्यात उष्ण व दमट राहील. मध्य महाराष्ट्रातही आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना व नांदेडला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यानुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट तर मराठवड्यातील लातूर, उस्मानाबादला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईचा पारा 34.1 अंशांवर गेला असून मुंबई उपनगराचे तापमान 38.4 अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यातील तापमानाचा पारा कमी होण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत आहेत.
Heat Wave देशातील हवामान कसं असेल?
नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 2 मे रोजी मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात 2 मे रोजी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. आसाम आणि मेघालयात 2 मे रोजी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 4 मे रोजी गंगेच्या पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, सौराष्ट्र, गुजरात प्रदेश, रायलसीमा, तेलंगणा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.