मुंबई
बॉलीवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या घरावर गोळीबार (Firing Case) केल्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे. या प्रकरणाची सीआयडी (CID) चौकशी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी अनुज थापन असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कोठडीत असताना आरोपीने चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आरोपीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सलमानच्या घरावर 14 एप्रिल रोजी पहाटे 4.15 च्या सुमारास गोळीबार झाला होता. हल्लेखोरांनी एकूण 4 गोळ्या बंगल्याच्या दिशेने झाडल्या. त्यापैकी एक गोळी घरात शिरली, तर उर्वरित घराच्या भिंतीवर लागल्या. पोलिसांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तपास सुरू केला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी गुजरात व पंजाबमधून प्रत्येकी 2 अशा एकूण 4 जणांना अटक केली होती.
गोळीबाराच्या घटनेनंतर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने फेसबुक पोस्टद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या नावाचीही या प्रकरणात आरोपी म्हणून नोंद केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सागर पाल व विकी गुप्ता या दोघांनी हा हल्ला केला. यापैकी विकी गुप्ता हा दुचाकी चालवत होता, तर सागर पालने प्रत्यक्ष गोळीबार केला. हे दोघेही बिहारचे आहेत.