लोकसभेच्या रणधुमाळीत कर्नाटकात सध्या एक वेगळेच प्रकरण गाजत आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू आणि कर्नाटकचे माजी मंत्री एच डी रेवण्णा यांचे पुत्र खासदार प्रज्वल रेवण्णा (Prajval Revanna) यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा (Sex Scandal) गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच जनता दलाने (सेक्युलर) (जेडीएस) प्रज्वल रेवण्णा यांना पक्षातून निलंबित केले आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच रेवण्णा यांनी प्रदशात पलायन केल्याचे समोर आले आहे.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा आमदार पुत्र एचडी रेवण्णा (६७) आणि नातू खासदार प्रज्वल रेवण्णा (३३) यांच्याविरुद्ध त्यांच्या घर मोलकरणीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर हासनमधील होलेनरसीपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्वल रेवण्णा यांच्या कथित सेक्स स्कॅन्डलचे व्हिडीओ त्यांच्या वाहन चालकानेच पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी राज्य एसआयटीकडून करण्याचा निर्णय कर्नाटक पोलिसांनी घेतला आहे.
हेही वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले…
Sex Scandal कोणताही राजकीय पक्ष पाठिंबा देणार नाही
प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात सेक्स स्कँडलचे आरोप एका भाजपच्या नेत्याने केले असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच या प्रकरणात कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे. या प्रकरणातील सत्य एसआयटीच्या तपासामधून समोर येईल, दोषींना शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्यांनी दिली आहे. प्रज्वल रेवण्णा हे हासन लोकसभा मतदारसंघातून एनडीएचे उमेदवार आहेत. याबाबत कर्नाटक भाजपचे अध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांनी सांगितले की, या प्रकरणाला कोणताही राजकीय पक्ष पाठिंबा देणार नाही. भाजपची भूमिकादेखील स्पष्ट आहे.
Sex Scandal प्रज्वल रेवण्णा पक्षातून निलंबित
दरम्यान, माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जेडीएसच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक झाली. या बैठकीत प्रज्वल रेवण्णा यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकरणाचा तपास राज्य एसआयटी मार्फत सुरु असून त्याचा तपासू पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रज्वल रेवण्णा यांचे निलंबन कायम राहणार असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. जनता दल कधीही चूक करणाऱ्याच्या पाठीशी राहिलेला नाही आणि राहणारही नाही”, असे मत कुमारस्वामी यांनी व्यक्त केले.