वाडा, राजगुरूनगर
शिरूर लोकसभा मतदारसंघात (Loksabha Elections) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे हे दोघेही प्रचारादरम्यान एकमेकांच्या समोर आले, एकाच व्यासपीठावर दोघेही आल्यानंतर एकमेकांच्यात चर्चा झाली आणि भाषणात जुगलबंदी देखील उपस्थितांना अनुभवायला मिळाली.
आज (सोमवार, दि. २९) रोजी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा खेड तालुक्यातील वाडा, चास, भोरगिरी भागात गावभेट दौरा आयोजित केला होता. यावेळी वाडा (ता. खेड) येथे एका अखंड हरीनाम सप्ताहाच्या व्यासपीठावर दोघेही एकाच वेळी उपस्थित होते. त्यावेळी दोघांनीही एकमेकांशी चर्चा केली. त्याचबरोबर दोघांनीही एकमेकांच्या चरणाला स्पर्श करत नमस्कार केला. डॉ. कोल्हे यांनी मध्यमांशी बोलताना सांगितले की, काही पत्रकारांनी माहिती दिली होती की, शिवजीदादा यांच्या प्रकृतीत काही बिघाड झाला होता, त्यावर मी विचारपूस केली त्यांनी प्रकृती ठीक असल्याचे सांगितले.
निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने
एवढंच नाही तर शिवजीराव आढळराव पाटील बोलताना भाषणात म्हणाले की, भविष्यात मी आपल्या नेहमी सुखदुःखात उपस्थित राहील, अडीअडचणीत साथ देईल, माझ्यावर आपले आशिर्वाद राहुद्या अशी अपेक्षा बोलताना व्यक्त केली. अर्थात निवडणुकीत माझ्या पाठीमागे उभे रहा, मला मतदान करा असं सांगण्याचा त्यांचा हेतू असावा. परंतु खासदार डॉ. कोल्हे यांनी मात्र तोच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार असल्याचा दाखला देत आढळरावांची चांगलीच पंचायत केली.
डॉ. कोल्हे म्हणाले की, २०१४ मध्ये मोदींनी आपल्या सर्वांना सांगितलं होतं की, मत द्यायला जाताना घरगुती गॅस सिलेंडरला एकदा नमस्कार करून जा. तेव्हाच्या आणि आत्ताची गॅस सिलेंडरच्या किंमतीचा विचार केला तर, आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागेल. ३७० कलम हटवले पण आपल्या शेतमालाला बाजारभाव मिळाला का ? महागाई कमी झाली का ? रोजगार मिळला का.? असा सवाल डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केला. १३ मे ला कोणाला मतदान करा हे मी या धार्मिक व्यासपीठावर सांगणार नाही परंतु, मत देताना जरूर विचार करा की, शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांना गाडी खाली चिरडलेल्या शेतकऱ्यांचा चेहरा आठवा, गॅस सिलेंडरच्या किंमती, बेरोजगारी डोळ्यासमोर ठेऊन मतदान करा. देशहितासाठी मतदान करा.
दरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे भाषण सुरू असताना माजी खासदार डॉ. आढळराव पाटील यांची सुरू असलेली चलबिचल उपस्थितांच्या नजरेत स्पष्ट जाणवत होती. आढळराव पाटील यांच्या समोरच उभं राहून मोदी सरकारची निष्क्रियता सांगताना डॉ. अमोल कोल्हे यांनी कुठलीच कसर सोडली नाही. यावेळी उपस्थितांनी देखील टाळ्यांच्या गजरात डॉ. कोल्हे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बाबाजी काळे, संजय घनवट, तनुजा घनवट, सुधीर मुंगसे, अमोल पवार, अशोक खंडेभारड, अतुल देशमुख, हिरामण सातकर, विजय डोळस, सोमनाथ मुंगसे, शिवाजी वर्पे, निलेश कड, रामदास धनवटे, मयूर दौंडकर, श्रद्धा सांडभोर, मनीषा सांडभोर, नीलिमा राक्षे यांसह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.