महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 5 टप्प्यात (Lok Sabha Election ) पार पडणार असून यातील दोन टप्पे पार पडले आहेत. मात्र उर्वरीत तीन टप्प्यांसाठी आमदार, खासदार आणि नेते मंडळींनी सभांचा धडाका लावला आहे. राष्ट्रीय मुद्दे, विकासाचे विषय, यासह नेतेमंडळी एकमेकांच्या वैयक्तित आयुष्यावरही भाष्य करताना दिसत आहेत. मात्र या सगळ्यात जात-पोटजातीच्या जाणिवा भारी पडताना दिसत आहेत. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जातीसंदर्भात अनुभव ठळकपणे दिसून आला. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण जातींभोवती फिरत असल्याचे चित्र स्पष्ट झालं आहे. (Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics around caste)
महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्वच नेते उमेदवारांचा प्रचार करताना जाहीर सभांमधून राष्ट्रीय प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यावर मते मागत असले तरी दुसरीकडे त्यांना जातींच्या आधारे विजयाची रणनीती आखावी लागत आहे. खरं तर पुरोगामी महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक मतदारसंघात जातीच्या आधारे मांडणी केली जात आहे. काही मतदारसंघांमध्ये दोन्ही किंवा तीन प्रमुख उमेदवार हे एकाच समाजाचे आहेत, त्यामुळे संबंधित उमेदवाराची पोटजात काय आहे, या गोष्टीला मतदारांकडून प्राधान्य दिले जात आहे.
मुंबई
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये जातीपातींचे संदर्भ दिसून येत नाहीत. महानगरीय संस्कृती राज्याची राजधानी जपते आणि जातपातनिरपेक्ष मतदान करते. पण, राज्याच्या मुंबई आणि ठाणे वगळता इतर भागात यावेळी जातीय ध्रुुवीकरण होताना दिसत आहे. याचे ठळक उदाहरण भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाले, तर नांदेडमध्ये पोटजात आणि सोयरे या दोन घटकांभोवती निवडणूक पार पडली. वर्धा मतदारसंघातील तेली विरूद्ध कुणबी समाज अशी निवडणूक गेली काही वर्षे होत होती. मात्र यावेळी रामदास तडस विरूद्ध अमर काळे यांच्या लढतीच्या निमित्ताने बहुजन समाजातील दोन मोठ्या जाती पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र आहे.
चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्या बाजूने डीएमके फॅक्टर चालविला गेला. या तीन समाजांच्या एकगठ्ठा मतांमुळेच भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याची चर्चा आहे. तर यवतमाळ-वाशिम मतदारसंघात एकाच समाजाच्या दोन मुख्य उमेदवारांच्या पोटजातींकडे पाहून मतदान केले हेले. जळगाव आणि रावेरमध्ये दोन मोठ्या समाजांच्या मतदानाचे गणित मांडले गेले. तर दुसरीकडे ‘खान पाहिजे की बाण’ या फॉर्म्युल्यावर चालणाऱ्या परभणी मतदारसंघात यावेळी बाणच गायब झाल्याचे चित्र आहे. सुरेस जाधव ठाकरे गटाचे उमेदवार यावेळी मशालीवर, आणि महादेव जानकर महायुतीचे उमेदवार शिट्टीवर निवडणूक लढवत आहेत, असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे.