26.6 C
New York

Tukdoji Maharaj : 30 एप्रिल मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त

Published:

30 एप्रिल मंगळवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त

लेख…

” कोठेही मुलांना लहानपणी व्यसनी लागू न द्यावे , कोणी लागताचि घ्यावी झाडणी शिक्षक पालकाची “
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

वरील अभंगातून तुकडोजी महाराज मुलांवर व्यसनांची छाया पडू नये त्यासाठी पालक व शिक्षकांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असा संदेश देतात. तुकडोजी महाराज (Tukdoji Maharaj) यांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे, त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरु अकडोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून ते अध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते.एवढेच नव्हे तर जपान सारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक सुद्धा झाली होती.

‘आते है नाथ हमारे’ हे त्यांनी रचलेले पद त्या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्ती गान ठरले होते. राष्ट्रपती भवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधले होते. राष्ट्रसंत यांचा जन्म 30 एप्रिल 1909 साली यावली, जिल्हा अमरावती येथे झाला. अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन आणि व्यसनमुक्तीसाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली.

तुकडोजी महाराजांनी 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराज हे नशाबंदी मंडळाचे संस्थापक, त्या काळात जेवढी साहित्य निर्मिती झाली तितकी जगभरात इतरत्र कुठेही झाली नसल्याचे मत अनेक साहित्यिकांनी व्यक्त केले आहे. संत साहित्य जगण्याच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यास आजही मदत करते. माणसाने संकटातून मार्ग कसा काढायचा याची दिशा संत साहित्य देते.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष , ” जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती! देह कष्टविति पर उपकारे!” ही संतांची खरी भूमिका. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्ती बरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाहीत. परंतु “बुडता हे जन न देखवे डोळा! येतो कळवळा म्हणउनि!!” यासाठी चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरुनानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्व संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे -गुरुकडे साकडे घातले आहे.

संत ज्ञानेश्वर- संत तुकाराम महाराजांपासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचे विचार दर्शन आहेत. त्यांच्या प्रार्थनांमध्ये विश्वकल्याण, विश्वबंधुत्व आणि माणुसकी यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. ‘मी’ पासून ‘आम्ही’ ‘ अवघे विश्वची माझे घर’ ‘ वसुधैव कुटुम्बकम्’ या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत.

संतांनी नेहमी स्वतःच्या अगोदर समाजाचा विचार केला, संपूर्ण मानव जातीचे कल्याण हा संतांच्या जीवनाचा हेतू होता. त्यासाठी त्यांनी त्रास सहन केला. लोकांकडून त्यांचा छळ झाला. प्रचंड कष्ट घ्यावे लागले. अनेक समस्यांना त्यांनी तोंड दिले मात्र परोपकार हेच ध्येय मानलेल्या संतांनी आपले कार्य नेटाने चालू ठेवले. संत ज्ञानेश्वरांना समाजाने भावंडासह वाळीत टाकले होते. तर संत एकनाथांच्या लोक अंगावर थुंकून त्रास देत. तुकाराम महाराजांच्या अभंग गाथा नदीमध्ये बुडवण्यात आल्या. या सर्व प्रकरणा नंतर ही संतांनी समाजसेवेचे व समाजप्रबोधनाचे आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवले. व्यसनांवर प्रहार हे संत साहित्यातील एक महत्त्वाचे अंग आहे. विविध संतांनी व्यसनांवर मांडलेले विचार महत्वाचे आहेत.

दारू गांजा मत पी यारो l
आकल गुंग होती है l
अपने पल्लों का दाम खर्च कर l
मूह मैं मिठ्ठी आती है ll

  • संत कबीर.

तंबाखू ओडोनी काढील जो धूर l
बुडेल ते घर येणे पापे ll

  • संत तुकाराम महाराज. रविदास मदिरा का पीजीए जो चढे -चढे उतारय!
    नाम महारस पिजिए जो चढे नाहि उतराय!
    -संत रविदास.

ऐसे पेय का सेवन मत करो, जिसके कारण बुद्धि भ्रष्ट हो जाए उदर मे विकार उत्पन्न हो,अपने और पराये में भेद ना जान सके और मालिक से धक्के खाये .

  • संत गुरुनानक.

अनेक संत महात्म्यांनी आपल्याला व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. व्यसन हे मनुष्यास अपायकारक असल्याचे त्यांनी त्यांच्या वाणीतून अभंगातून व गाथेतून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु मनुष्य मात्र व्यसनांपुढे एवढा हतबल आहे की ज्यांना तो पूजतो मानतो त्यांच्याच विचारांशी प्रतारणा करतो. म्हणून की काय गाडगे महाराजांनी एवढी आक्रमक भूमिका मांडली तर नसेल ना असा प्रश्न निर्माण होतो.

व्यसनमुक्तीसाठी आणि जीवनातील प्रत्येक समस्येवर आजही संतांचे विचार आपणास मार्गदर्शक ठरतात. मानवी देह प्राप्त झाल्यावर जीवनाचा उद्धार करणे मानवाचे प्रथम उद्दिष्ट असले पाहिजे. व्यसनांच्या नादी लागून हे अमूल्य जीवन नष्ट करू नका , वाया घालवू नका. हि तुम्हा सर्वास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हात जोडूनी विनंती.

अमोल स. भा. मडामे

(मुख्य संघटक, सचिव नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य )

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img