पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय जाहीर (Pakistan Team Coach) केला आहे. पाकिस्तान संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानने कसोटी संघासाठी वेगळा तर एकदिवसीय आणि टी 20 संघांसाठी वेगळे प्रशिक्षक नियुक्त केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, टीम इंडियाला विश्वचषक जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे दक्षिण आफ्रिका संघाचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन टी20 (Gary Kirsten) आणि एकदिवसीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहणार आहेत. या व्यतिरिक्त कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलियाचे माजी गोलंदाज जेसन गिलेस्पी यांची (Jason Gillespie) नियुक्ती करण्यात आली आहे.
जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत गॅरी कर्स्टन पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक असतील. बाबर आझमला पुन्हा कर्णधार करण्यात आले आहे. आता या दोघांची जोडी काय कमाल दाखवणार हे जून महिन्यातील विश्वचषक स्पर्धेत दिसेल. पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी सध्या ढासळली आहे. संघाला चांगला प्रशिक्षक नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चांगल्या प्रशिक्षकांच्या शोधात होते. आधीच्या प्रशिक्षकांचा राजीनामा आधीच घेण्यात आला होता. त्यानंतर आता प्रशिक्षकपदाची जागा भरण्यात आली आहे. गॅरी कर्स्टन भारतीय संघाचे कोच होते त्यावेळी त्यांनी संघात केलेले बदल, त्यानंतर संघाला मिळालेलं यश या गोष्टींची क्रिकेटविश्वात अजूनही चर्चा होत असते.
याआधी गॅरी कर्स्टन यांनी टीम इंडियाचे हेड कोच म्हणून काम पाहिले होते. या काळात त्यांनी टीम इंडियाचा चेहरामोहराच बदलून टाकला होता. त्यांच्याच काळात भारतीय संघाने सन 2011 मध्ये विश्वचषकावर नाव कोरलं. आता गॅरी कर्स्टन अशीच कामगिरी पाकिस्तानात करणार का, हा प्रश्न आहे. जेसन गिलेस्पीला नव्या जबाबदारीसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.