26.6 C
New York

IPL 2024 : राजस्थाननं आठवा सामना जिंकत प्लेऑफमध्ये केलं स्थान निश्चित

Published:

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (RR) संघानं इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या हंगामात 8 वा विजय नोंदवून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलाय. शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थाननं लखनऊ सुपर जायंट्सचा (LSG) 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाचे आता 16 गुण झाले असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहेत. हे गुण प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी पुरेसे आहेत. मात्र पुढील विजय राजस्थान संघाचा प्लेऑफमधील अधिकृत प्रवेश निश्चित करेल.

राजस्थाननं या हंगामात IPL 2024 आतापर्यंत 9 पैकी 8 सामने जिंकले आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघानं आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. आता याच बरोबर गुणतालिकेत हा संघ चौथ्या स्थानावर आहे. ज्यामध्ये लखनऊच्या संघानं नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 197 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात राजस्थान संघानं 19 षटकांत 3 गडी गमावून 192 धावा करत सामना जिंकला. संघासाठी संजू सॅमसन याने 33 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी खेळली तर ध्रुव जुरेलनं 34 चेंडूत 52 धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय जोस बटलरनं 34 आणि यशस्वी जैस्वालनं 24 धावा केल्या. लखनऊकडून यश ठाकूर, मार्कस स्टॉइनिस आणि अमित मिश्रानं 1-1 बळी घेतला.

लखनऊची समाधानकारक मजल

तत्पुर्वी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघानं 5 गडी गमावून 196 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलनं 31 चेंडूत अर्धशतक केलं. मात्र 48 चेंडूत 76 धावा करुन तो बाद झाला. त्याच्याशिवाय दीपक हुडानं 31 चेंडूत 50 धावांची खेळी केली. एकवेळ लखनऊ संघानं 11 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर कर्णधार राहुल आणि दीपक यांच्यात 62 चेंडूत 115 धावांची भागीदारी झाली. तर राजस्थान संघाकडून संदीप शर्मानं सर्वाधिक 2 बळी घेतले. याशिवाय आवेश खान, ट्रेंट बोल्ट आणि अश्विन यांना प्रत्येकी 1 बळी मिळाला.

या हंगामातील लखनऊ आणि राजस्थान यांच्यातील ही दुसरी लढत होती. यापूर्वीचा सामना 24 मार्च रोजी झाला होता. ज्यात राजस्थान संघानं 20 धावांनी विजय मिळवला होता. अशाप्रकारे राजस्थाननं या मोसमात दुसऱ्यांदा लखनऊचा दणदणीत पराभव केलाय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img