‘अन्नपूर्णा’ या नावाने प्रसिद्ध असलेली भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे (Amrita Pandey Death) हिचा शनिवारी संध्याकाळी उशिरा भागलपूरच्या आदमपूर जहाज घाट येथील दिव्यधर्म अपार्टमेंटमध्ये मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जोगसर पोलिसांनी तेथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला. पोलिसांनी या घटनेचा एफएसएलमार्फत तपास केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तिच्या गळ्यातील फास आवळण्यासाठी वापरलेली साडी, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. दिवंगत अमृता पांडे हिने भोजपुरी आणि हिंदी दोन्ही भाषांमधील अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरिज आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. संशयास्पद परिस्थितीत तिचा मृत्यू होण्यापूर्वी भोजपुरी अभिनेत्रीने व्हॉट्सॲपवर एक स्टेटस पोस्ट केले होते.
मरण्यापूर्वी भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडेने तिच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर लिहिले – ”उसकी जिंदगी दो नावों पर है, हमने अपनी नाव डुबो कर उसकी राह आसान कर दी’. दरम्यान, सायंकाळी अपार्टमेंटमध्ये महिलेने आत्महत्या केल्याची माहिती जोगसर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिस स्टेशनचे प्रमुख कृष्ण नंदन कुमार सिंह, एसआय राजीव रंजन आणि शक्ती पासवान घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना अभिनेत्री अमृता पांडेचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. या घटनेबद्दल कुटुंबीयांनी देखील सांगितले की, दुपारी साडेतीन वाजता अमृताची बहीण तिच्या खोलीत गेली तेव्हा तिला लटकलेल्या अवस्थेत दिसली. कुटुंबीयांनी त्वरीत चाकूने फास कापला आणि तिला स्थानिक खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
कुटुंबीयांनी सांगितले की, अमृताची मोठी बहीण वीणा पांडे हिचे 18 एप्रिल रोजी घरी लग्न होते. शुक्रवारी रात्री त्यांनी खूप धमाल केली. पुन्हा अचानक काय झालं? कोणालाच कळले नाही. पुढे त्यांनी सांगितले की, अमृताचे लग्न 2022 मध्ये छत्तीसगडच्या बिलासपूर येथील चंद्रमणी झांगडशी झाले होते. तो मुंबईत ॲनिमेशन इंजिनीअर म्हणून काम करतो. अमृताच्या बहिणीने सांगितले की, ती तिच्या करिअरबद्दल ती खूप टेन्शनमध्ये होती. यामुळे त्यांच्यावर उपचारही सुरू होते.
भोजपुरी चित्रपटांव्यतिरिक्त अमृताला अनेक वेब सीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. अमृताने अनेक भोजपुरी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले तसेच नुकताच अमृताच्या हॉरर वेब सिरीज ‘प्रतिशोध’ चा पहिला भाग रिलीज झाला.