जुन्नर : कांदा निर्यातबंदी (Onion Export) उठवल्याच्या बातम्या आल्या. पण, अद्याप विदेश व्यापार विभागाने तसे कोणतेही नोटीफिकेशन (Notification) काढलेले नाही. याचाच अर्थ कांदा निर्यात बंदी उठलेलीच नाही. कांदा निर्यातबंदीवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं पाप केल्याची घणाघाती टीका शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी केली. महाराष्ट्राची भाकरी खाऊन, गुजरातची चाकरी करायची असेल तर महाराष्ट्राने तुम्हाला का साथ द्यावी, असा सवाल डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे शनिवारी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदीबद्दल केलेल्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.
“गुजरातच्या कांद्याची निर्यातबंदी ज्यांनी उठवली आणि गुजरातच्या शेतकऱ्यांच भल केलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात रोष निर्माण झाल्यावर घाईघाईने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोट ट्विट करावं लागत असेल तर, फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांनी याचं उत्तर द्यावं, असे आव्हान डॉ. कोल्हे यांनी दिले.