डोंबिवली ( शंकर जाधव )
कोकणवासियांसाठी लढा देणाऱ्या अखिल कोकण भारतीय विकास महासंघाने येत कल्याण (Lok Sabha elections) लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघाचे महायुतीचे भाजप उमेदवार खासदार नारायण राणे यांना महासंघाचा पाठिंबा जाहीर केला आहे.डोंबिवलीत पार पडलेल्या महासंघाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. कोकणवासियांनी मे महिन्याची सुट्टीत गावाला जाताना मतदान करावे असे आवाहनही महासंघाने केले आहे.
अखिल कोकण भारतीय विकास महासंघाच्या डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा येथील कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेचे अध्यक्ष तानाजी परब, सचिव एडवोकेट विनायक राणे, खजिनदार महेश राऊळ, सल्लागार डॉक्टर सर्वेश सावंत, सिंधुदुर्ग मित्र मंडळ अध्यक्ष रामकृष्ण शिरोडकर, संघटनेच्या घटनेचे शिल्पकार दीपक देसाई, सहसचिव नंदकिशोर राणे, उपाध्यक्ष वामन गावडे, देवगड तालुका अध्यक्ष संतोष कदम, सल्लागार आत्माराम नाटेकर आदी उपस्थित होते.
पत्रकरांशी बोलताना महासंघाचे अध्यक्ष तानाजी परब म्हणाले,कल्याण लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदार संघाचे महायुतीचे भाजप उमेदवार खासदार नारायण राणे यांना महासंघाचा पाठिंबाजाहीर केला आहे.दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आहे.
कोकणवासीयांनी ज्या ठिकाणी मतदार यादीत आपले नाव आहे त्या ठिकाणी जाऊन मतदानाचा हक्क बजावावा. महासंघाचे जवळपास 35 हजाराहून अधिक सदस्य असून कल्याण डोंबिवलीत कोकणवासीयांची संख्या सुमारे चार लाख आहे. महासंघाच्या माध्यमातून कोकणवासीयांच्या शहरातील तसेच गावाकडील समस्या सोडविल्या जातात. मुख्य म्हणजे कोकण रेल्वेबाबतच्या कोकणवासीयांच्या मागण्यांसाठी दिल्लीपर्यंत जाऊन पाठपुरावा करून काही मागण्या महासंघामुळे पूर्ण झाल्या आहेत. लोकांच्या समस्यांसाठी महासंघ सतत लढत असल्याने कोकणवासीयांचा महासंघावर पूर्ण विश्वास आहे. यावेळी डॉ. सर्वेश सावंत म्हणाले, सर्व सभासदांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांच्या अनुमतीने महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा द्यायचा असा निर्णय घेण्यात आला.महासंघाच्या निर्णयामुळे महायुतीचे दोन्ही भरघोस मतांनी नक्कीच निवडून येतील.