सिंधुदुर्ग
शिवसेना (Shiv Sena) आणि नारायण राणे (Narayan Rane) यांचा वाद संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला माहित आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा (Ratnagiri Sindhudurg Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत (Vinayak Raut) आणि महायुतीच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यापूर्वी नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर विनायक राऊत यांनी राणेंवर हल्लाबोल केला आहे.
विनायक राऊत म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा रस्ता अडवणारी औलाद अजून जन्माला आली नाही. नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्याला आम्ही केराची टोपली दाखवतो. नारायण राणे यांनी पक्षप्रमुखांचा रस्ता काढूनच दाखवावा, त्यांना पुन्हा एकदा शिवसैनिक काय आहे हे कळेल, असा इशारा विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना दिला.
उद्धव ठाकरे यांची सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघात प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. यावरून नारायण राणे यांनी म्हटले होते की, उद्धव ठाकरे यांनी सभेत माझ्यावर शेलक्या भाषेत टीका केल्यास त्यांना परत जायचा रस्ता कुठून जातो ते मी दाखवतो.