21 C
New York

Heart Transplant : फिर भी दिल है हिंदुस्तानी… पाकिस्तानी तरुणीला मिळाले भारतीय हृदय

Published:

आयेशा राशन. पाकिस्तानच्या कराची शहरात राहणारी १९ वर्षांची गोड तरुणी. फॅशन डिझायनर म्हणून करिअर करण्याची तिची मनीषा. पण, नियतीला आयेशाच्या आयुष्यात काही वेगळंच घडवायचं होतं. आयेशाला हृदयविकार होता. २०१९ साली तिचा हा आजार गंभीर वळणावर गेला. परिस्थिती इतकी गंभीर बनली की, तिच्या जगण्याच्या आशाच संपल्या. आयेशाच्या हृदयाच्या झडपांमध्येच छिद्र पडले. हळूहळू आयेशाचे हृदय काम करणं बंद करेल आणि तिचा मृत्यू होईल, असे डॉक्टरनी सांगितले. आयेशाचं कुटुंब हवालदिल झालं. तिच्या स्वप्नांचं काय? हे काय तिचं मरायचं वय आहे का? असे प्रश्न कुटुंबियांना सतावू लागले. पाकिस्तानात तर तिच्यावर उपचार होण्याच्या आशाच नव्हत्या. मग एक आशेचा किरण दिसला.

आयेशाला घेऊन तिची आई सनोबर भारतात आल्या. चेन्नईतील एमजीएम हेल्थकेअरमध्ये डॉक्टरांनी आयेशाची तपासणी केली. तिचे हृदय बदलण्याशिवाय पर्याय नाही, (Heart Transplant) या निष्कर्षापर्यंत डॉक्टर आले. त्यासाठी खर्च येणार होता ३५ लाख रुपये. एवढे पैसे खर्च करण्याची आयेशाच्या कुटुंबाची ऐपत नव्हती. आता करायचे काय, हा प्रश्न पडला. त्यांची हि चिंता मिटवली एमजीएम हेल्थकेअर आणि चेन्नईतील ऐश्वर्यम ट्रस्टने. आयेशा ही आपलीच मुलगी आहे, असे समजून हॉस्पिटल आणि ट्रस्टने तिच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च उचलला. आयेषाचे नशीब बलवत्तर होते म्हणून ती भारतीय नसतानाही तिला तातडीने दिल्लीतील एका ६९ वर्षे वयाच्या व्यक्तीचे हृदय मिळाले. आयेशाला जीवदान मिळाले.

भारत – पाकिस्तानात कितीही दुष्मनी असली तरी जेव्हा एखादा जीव वाचवण्याचा प्रसंग येतो, तेव्हा भारतीय लोक सारी दुष्मनी विसरून पुढे सरसावतात, याची प्रचिती आयेशा आणि तिची आई सनोबर यांना आली. आयेशा पाकिस्तानी असली तरी आज तिच्या शरीरात धडधडणारे हृदय भारतीय आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img