बेरोजगारीची (Unemployment) त्रासलेल्या तरुणाने नांदेड लोकसभा (Nanded Loksabha) मतदार संघातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर कुऱ्हाडीने घाव घालून मतदानयंत्र (EVM) फोडल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. भैय्यासाहेब येडके या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून आपण हे कृत्य बेरोजगारीला कंटाळून केल्याचा दावा येडकेने केला आहे. या प्रकारामुळे मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड व परभणी या ८ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान झाले. मतदानासाठी अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह होता, मात्र, नांदेड जिल्ह्यात उत्साह दिसून येत होता. एकीकडे पोलीस आणि निवडणूक आयोग मतदान सुरुळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे एका तरुणाने कुऱ्हाडीने मतदान यंत्र फोडल्याने गोंधळ उडाला. सुरक्षा व्यवस्था कडक असताना हा तरुण मतदान केंद्रावर कुऱ्हाड घेऊन कसा आला, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आरोपी भैय्यासाहेब येडके हा तरुण उच्चशिक्षित आहे. त्याचे कला शाखेतून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तरीही त्याला अद्याप नोकरी मिळाली नाही. सरकारच्या धोरणांमुळे आपल्यावर ही वेळ आपल्याच येडके याचे म्हणणे आहे. या रागातूनच त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच बिलोलीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप यांच्यासह तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी येडकेला ताब्यात घेतले. या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. फुटलेल्या मशीनमध्ये थोड्या प्रमाणात मतदान झाले होते, मात्र मुख्य युनिट सुरक्षित असल्यामुळे हे मतदान सुरक्षित असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राजेंद्र राऊत यांनी सांगितले.