मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरू आहे. मात्र अद्यापही महायुतीच्या (Mahayuti) चार ते सहा जागांवरील तिढा कायम आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) उमेदवार जाहीर करणे आणि जागा वाटपात आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीने मुंबईतील सहा जागांपैकी पाच जागांवर उमेदवार जाहीर केले. मात्र, महायुतीत मुंबईतील जागांचा तिढा कायम आहे. यासंदर्भात आज भाजपने (BJP) महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.
मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागांवर मे महिन्यात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आज उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीन लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीने पाच मतदार संघात उमेदवार घोषित केले आहेत.
मुंबईतील लोकसभा जागांसंदर्भात भाजप महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मा आढावा घेणार आहेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात यावी, याकरिता देखील चर्चा होणार आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार पूनम महाजन देखील निवडणूक पुन्हा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये पुनम महाजन डेंजर झोन मध्ये असल्याने त्यांना उमेदवारी न मिळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपकडून इतर नावांची चाचणी सुरू आहे. यामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार, ज्येष्ठ कायदे तज्ञ उज्वल निकम आणि पराग अळवणी या नावाची चर्चा आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसकडून उत्तर मध्य मुंबईमध्ये मुंबई काँग्रेस अध्यक्षा डॉ. वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र, ही जागा ठाकरे गटाला गेल्याने वर्षा गायकवाड उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार आहे.