निवडणुकीच्या काळात जसा जोरदार प्रचार करून (Loksabha Election 2024) मतदारांकडे मते मागितली जातात तसेच या मतदारांना गोंधळात टाकणाऱ्याही खेळ्या खेळल्या जातात. यातीलच एक खेळी म्हणजे नावात साम्य असलेले उमेदवार. बारामतीत शरद पवार, रायगडमध्ये अनंक गीते नावाचे उमेदवार आहेत. असाच काहीसा प्रकार आता नगरच्या रणांगणात घडला आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंकेंच्या नावाचे साम्य असलेल्या आणखी एका उमेदवारानं अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे येथील निवडणुकीत आता महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि अपक्ष नीलेश साहेबराव लंके असे नावात साम्य असलेले दोन उमेदवार झाले आहेत.
नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीचा चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असा सामना या मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार देखील सुरु झाला आहे. दोन्ही उमेदवारांनी आपापले उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान महायुतीकडून सुजय विखे आणि महाविकास आघाडीकडून निलेश ज्ञानदेव लंके यांनी आपापले अर्ज दाखल केले आहेत. मात्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे कन्फ्यूजन वाढलं आहे.
निलेश साहेबराव लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. निलेश लंके नावाचे दोन उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. मात्र, यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या मतांवर काहीही परिणाम होणार नाही. तसेच डमी लंके यांच्या अर्जावर आम्ही कोणतीही हरकत घेणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.
सारख्या नावांचे उमेदवार, जुनीच खेळी
निवडणुका जिंकण्यासाठी साम, दाम, दंड याचा अवलंब केला जातो हे तर आपण जाणतो. यातच लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळे डाव टाकले जातात. यामध्ये एकाच नावाचे अनेक उमेदवार अर्ज दाखल करतात. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या नावाच्या एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच रायगड लोकसभा मतदारसंघातून देखील शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते उभे आहेत. मात्र, अनंत गीते नावाच्या आणखी दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यामुळे राजकारणात एकाच नावाची अनेक उमेदवार अर्ज दाखल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.