3.6 C
New York

Devendra Fadnavis : विरोधकांच्या इंजिनमध्ये फक्त परिवारासाठी जागा, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Published:

अरविंद गुरव, पेण

विरोधकांना असे वाटते की, ही निवडणूक ग्रामपंचायतीची सुरु आहे. त्यांना याबाबत कल्पना नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की, ही निवडणूक देशाचे नेतृत्व ठरवण्याची निवडणूक (Loksabha Elections) आहे. ही निवडणूक आपला देश कोणाच्या हातात द्यायचा त्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये एकीकडे पर्याय विश्वगुरु नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहेत. त्यांच्याबरोबर महायुतीमधील (MahaYuti) सर्व पक्ष आहेत. तसेच दूसरीकडे राहुल गांधी आहेत. हा देश कुणाच्या हाती द्यायचा, याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. महायुतीत एकीकडे शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस गट, रामदास आठवले यांचा पक्ष, कवाडे यांचा पक्ष, जानकरांचा रासप आहे आणि आता राज ठाकरेंच्या मनसेची साथ महायुतीला लाभली आहे. तर दुसरीकडे त्या ठिकाणी राहुल गांधींची (Rahul Gandhi) 26 पक्षांची खिचडी आहे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला.

रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) उमेदवार सुनिल तटकरे यांच्यासाठी महायुतीची जाहीर सभा पेण येथे पार पडली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले. विरोधकांच्या इंजिनमध्ये फक्त त्यांच्या परिवारासाठी जागा आहे. सामान्य माणसांसाठी जागा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सगळा भारत देश हाच त्यांचा परिवार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राहुल गांधी त्यांचे इंजिन दिल्लीकडे ओढतात, शरद पवार त्यांचे इंजिन बारामतीकडे ओढतात, उद्धव ठाकरे त्यांचे इंजिन मुंबईकडे ओढतात. शरद पवारांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे यांनाच जागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे, त्यामध्ये संजय राऊतांनाही जागा नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली. तर आपल्या महायुतीचे इंजिन नरेंद्र मोदी आहेत. त्याला वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहेत. त्यात गोरगरीब, आदिवासी, शेतकरी महिला, अल्पसंख्यांक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्वांना बसण्याची जागा आहे. सर्वांना यामध्ये बसून ‘सबका साथ सबका विकास, म्हणत आपली विकासाची गाडी पुढे चालली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींना त्यांच्या खिचडीचे लोक नेता मानायला तयार नाहीत. परवा कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधी हे अपरिपक्व आहेत. ते देशाचे नेतृत्व करु शकत नाहीत. त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की, राहुल गांधी यांना नेता मानायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे तयार नाहीत, अशी फिरकी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

उद्धव ठाकरेंनी आपला जाहीरनामा घोषित केला त्यांचा जाहीरनामा तर घोषित व्हायच्या आधीच जमिनीवर पडला जाहीरनामालाही मान्य नव्हतं की त्यांच्याकडून आपण घोषित व्हावं. असा मिश्किल टोला ऊबाठा गटाच्या जाहिरनाम्या वरुन देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना मारला.

रायगड मधील बाळगंगाधरणाच्या संदर्भात बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आंदोलकांना मी सांगू इच्छितो काळजी करू नका सगळे प्रश्न आम्ही या ठिकाणी सोडवतो आहोत. बाळगंगा धरण त्या ठिकाणी योग्य प्रकारे पूर्ण करण्यात येईल. येथील प्रकल्पग्रस्थांचे प्रश्न योग्य प्रकारे सोडविला जाईल. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न जो आहे तो योग्य प्रकारे मार्गी लावला जाईल असे आश्वासन यावेळी बाळगंगा धरण बाधितांना दिले. तसेच मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता सुनील तटकरे यांना निवडून द्या आणि ७ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या वेळी घड्याळ या चिन्हा समोरील बटन दाबन्याचे आवाहन देवेंद्र फड़नवीस यांनी केले.

लोकसभा रायगड रत्नागिरी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी उपस्थितांना संबोधताना सांगितले की महायुती 400 चा आकडा निश्चितच पार करेल असा विश्वास व्यक्त करत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा समाचार घेतला अनंत गीते यांच्यावर टीका करताना आनंद गीते यांचे दुसरे नाव “निष्क्रिय ते अनंत गीते” असे आहे. असा खोचक टोला तटकरे यांनी लगावला. त्याच बरोबर देशात केंद्र सरकार आणि राज्यात राज्यसरकार यांनी केलेल्या कामाचा आलेख तटकरे यांनी उपस्थितांसमोर ठेवला.

अनंत गीते यांचा समाचार घेतांना तटकरे म्हणाले की, अनंत गीते यांनी ८ निवडणुका कमळ या चिन्हा सोबत लढल्या. आणि आता तेच भाजपवर खालच्या पातळीत टीका करीत आहेत. अनंत गीते हे मोदी सरकार मध्ये अवजड़ उद्योग खात्याचे मंत्री होते. मंत्री असूनही त्यांना या जिल्ह्यांतील तरुणांना नोकऱ्या देता आल्या नाहीत याच्यावरुनच गीतेची निष्क्रियता दिसून येते. निसर्ग चक्रीवादळ असेल किंवा कोरोणा सारखी महामारी असेल यावेळी अनंत गीते कुठे लपला होतात ? या संकट काळात जेव्हा तुमची गरज या मतदारसंघाला होती तेव्हा तुम्ही कुठे दिसला नाहीत. मात्र हा सुनील तटकरे दिवस रात्र या मतदारसंघातील नागरिकांसोबत होता.

देशात ‘नमो नारी शक्ती’ अभियान सुरू झाले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अदितीने चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी जाहीर केले आहे. या सरकारने मातृशक्तीचा सन्मान केला आहे. या मातृशक्तीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणून नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे आहे असे आवाहन तटकरे यांनी यावेळी केले.

महिलांना संसदेत व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण कॉंग्रेसने दिले नाही मात्र नरेंद्र मोदी यांनी आरक्षण देऊन ही किमया केली आहे. अनेक क्रांतिकारी निर्णय मोदींनी घेतले आहेत. सूक्ष्म – लघू उद्योगातून ३३ टक्के सबसिडी महिलांना मिळते. बचत गटांना फिरता निधी ३० हजार रुपयांचा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला अशी माहितीही यावेळी महिलांना दिली.

यासभे वेळी पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना प्रतोद आ. भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे, बाळासाहेब पाटील, आरपीआयचे मधुकर कांबळे, सिताराम कांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नीलिमा पाटील, पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील, गीता पालरेचा, माजी जिल्हा परिषद सदस्य वैकुंठ पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, संदीप ठाकूर, राष्ट्रवादी पेण शहराध्यक्ष जितू ठाकूर, राजेश मापारा यांसह महायुतीतील नेते आणि हजारोंच्या संख्येने मतदार नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img