पाहिजे तेवढा निधा देतो मात्र, त्यासाठी कचाकचा बटण दाबा या अजितदादांच्या (Ajit Pawar) विधानावरून चांगलाच गदारोळ झाला होता. या विधानाविरोधात अजित पवारांविरेधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रारदेखील दाखल करण्यात आली होती. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत अजितदादांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागतोय की काय? असे वाटत होते. मात्र, निवडणूक आयोगाने दादांच्या कचाकचा विधानावर पटापटा सूत्र हलवत त्यांना पटकन क्लिनचिट दिली आहे. क्लिनचिटची एकप्रत राज्य निवडणूक आय़ोगालादेखील पाठवण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकरी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केला आहे.
काय म्हटले निवडणूक आयोगाने?
बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटण कचाकचा दाबा , अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल अस वक्तव्य केल होत या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी कविता द्विवेदी यांच्याकडून करण्यात आली. प्राथमिक चौकशीत अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव त्यांच्याकडून घेण्यात आले नव्हते. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही अस कविता द्विवेदी यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आलय.
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ वारंवार पाहिला. यामध्ये मला आढळून आले आहे की आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन झाले नाही,” असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी या पत्रकात सांगितले आहे. व्हिडिओमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार मतदारांना ईव्हीएमसाठी मतदान करण्यास सांगत असल्याचे ऐकले आहे… विशिष्ट उमेदवार किंवा पक्षाला मत द्या, असे ते म्हणालेले नाहीत. आणि त्यामुळे हे कोणत्याही आचारसंहितेचे उल्लंघन होत नाही,” असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. द्विवेदी म्हणाल्या की त्यांनी हा अहवाल जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे पाठवला आहे, जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत आणि त्याची प्रत राज्य निवडणूक आयोगाला देखील पाठवली आहे. यासंबधीचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
नेमकं काय घडलं होतं?
सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान उपस्थितांना कचाकचा बटण दाबा असं विधान करणं अजित पवारांना (Ajit Pawar) भोवण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांच्या या विधानाविरोधात निवडणूक आयोगाकड तक्रार दाखल करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करत गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर विरोधकांनी देखील याबाबत तक्रार दिली होती, त्यानंतर राज्या निवडणूक आयोगाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अजित पवारांच्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.