टॉलिवूडसह बॉलीवूडमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या (Tamannaah Bhatia) अडचणीत वाढ झाली आहे. नुकतंच महाराष्ट्र सायबर सेलने तमन्ना भाटियाला समन्स बजावले आहे. २०२३ मध्ये आयपीएलचा सामना फेअरप्ले अॅपवर (Fairplay App) तमन्नाने लाईव्ह स्ट्रीम केले होते. यामुळे व्हायाकॉम कंपनीला कोट्यवधींचं नुकसान झाले होते.
याप्रकरणी येत्या २९ एप्रिलला अभिनेत्रीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. वायकॉमच्या तक्रारीवरून फेअरप्ले अॅपविरोधात महाराष्ट्र सायबर सेलने एफआयआर नोंदवला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तमन्नाची चौकशी करण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, तमन्ना भाटियाने फेअरप्लेची जाहिरात केली होती. त्यामुळे तिला साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले. सायबर पोलिसांना अभिनेत्रीकडून हे समजून घ्यायचंय की तिला जाहिरात करण्यासाठी तिच्यासोबत कोणी संपर्क साधला होता?, तिला ही जाहिरात कशी मिळाली ?, या जाहिरातीसाठी अभिनेत्रीला किती मानधन मिळाले ? यासाठी अभिनेत्रीला महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलवले आहे.
दरम्यान, या प्रकरणामध्येच मंगळवारी (२३ एप्रिल) बॉलिवूड अभिनेता संजय दत्तलाही महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र संजय दत्त मंगळवारी चौकशीला हजर झाला नसल्याची माहिती आहे. संजय दत्तने चौकशीसाठी आणखी वेळ मागितला असून त्याने सायबर सेलला दिलेल्या माहितीनुसार, काही नियोजित कामांमुळे मुंबईबाहेर असल्याने २३ एप्रिलला चौकशीसाठी उपस्थित राहू शकला नाही.
तमन्नाला २९ एप्रिलला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. वायकॉमने दिलेल्या तक्रारीनुसार, फेअरप्ले अॅपने २०२३ चे टाटा आयपीएल अनधिकृतरित्या स्क्रीनिंग केले होते. त्यामुळे १०० कोटी रुपयांचे नुकसान वायकॉमला झाले होते. तसेच या प्रकरणी, महाराष्ट्र सायबर सेलने रॅपर बादशाहचाही जबाब नोंदवला आहे. तपास दरम्यान, कलाकारांना पैसे दिल्याचेही पोलिस चौकशीमध्ये समोर आले.
संजय दत्तला प्ले व्हेंचर नावाच्या कंपनीच्या खात्यातून पैसे मिळाले होते, ही कंपनी कुराकाओ येथील आहे. तसेच बादशाह, जॅकलिन फर्नांडिसला देखील पैसे पाठवण्यात आले होते. फेअरप्ले व्यतिरिक्त, गुगलकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिकाशो ॲपवर युजर्सला नवीन रिलीज झालेले चित्रपट आणि वेबसीरीज उपलब्ध आहे. त्यामुळे यासंबंधितही महाराष्ट्र सायबरकडून सध्या चौकशी सुरु आहे.