‘ताझा खबर’, ‘मिर्झापूर’ सारख्या वेब सीरिजमधून चर्चेत आलेली अभिनेत्री श्रिया पिळगांवकर(Shriya Pilgaonkar). सध्या ती ‘ब्रोकन न्यूज २’ या तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. तिची भूमिका राधा भार्गवच्या रुपात पुन्हा एकदा ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी तयार आहे. दिग्गज मराठमोळं सेलिब्रिटी जोडपं सुप्रिया व सचिन पिळगांवकर यांची श्रिया लेक आहे.
मात्र, ती त्यांची दत्तक मुलगी असल्याच्या काही बातम्या येत होत्या. आता एका मुलाखतीत खुद्द श्रियालाच याबाबत विचारण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देत श्रिया म्हणाली, “एका बातमीत कुठेतरी म्हटलं होतं की मला दत्तक घेण्यात आलं होतं. पण तसं नाही, मी माझ्या आई-वडिलांची दत्तक मुलगी नाही. त्यांनी मला दत्तक घेतल्याची एक बातमी आली होती, पण ती पूर्णपणे खोटी बातमी आहे.”
श्रिया पुढे म्हणाली, “खरं तर काहीतरी मी या विषयावर स्पष्टीकरण द्यावं असा हा विषय नाही, कारण मी माझी बाजू मांडण्यासाठी माझं जन्म प्रमाणपत्र इन्स्टाग्रामवर दाखवणार नाहीये. पण हो, ही बातमी अजिबात खरी नसली तरी हास्यास्पद नक्कीच होती. पण, याशिवाय इतर कोणत्याही वाईट गोष्टी माझ्याबद्दल लिहिल्या गेलेल्या नाहीत.
कोणत्याही वाईट अफवा पसरवून मी छोट्या-मोठ्या पीआर अॅक्टिव्हिटीजच्या दृष्टिकोनातून त्याकडे पाहत नाही. माझ्याकडे चांगला प्रोजेक्ट असेल तर त्याबद्दल मी माध्यमांसमोर बोलू शकते पण फक्त बातम्यांमध्ये राहण्यासाठी मी माझ्याबद्दल खोटी माहिती देणार नाही,” असं श्रिया म्हणाली.
‘द ब्रोकन न्यूजचा’ दुसरा सीझन ३ मे २०२४ रोजी OTT वर रिलीज होणार आहे. तो झी५ वर प्रीमियर होईल. या मालिकेत श्रियासोबत जयदीप दिपंकर सन्यालच्या भूमिकेत दिसणार असून सोनाली बेंद्रे अमीना कुरेशीच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्यांच्याशिवाय इंद्रनील सेनगुप्ता आणि तारुक रैना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.