मुंबई
दोन दिवसांपूर्वी मनसे नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thakrey) यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे रविंद्र वायकर (Ravindra Waykar) आणि संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून या दोघांच्या संभाव्य उमेदवारीला माझा विरोध असेल, असे शालिनी ठाकरे म्हणाल्या होत्या. मनसेने मात्र आता यावर हात झटकले आहेत. शालिनी ठाकरे यांचे मत हे व्यक्तिगत असून त्यांचे हे वक्तव्य पक्षाची भूमिका नाही, असे मनसेने स्पष्ट केले आहे. मनसे नेते शिरीष सावंत यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
उत्तर पश्चिम मुंबईतून महायुतीने लोकसभेचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले रवींद्र वायकर तर काँग्रेसने कारवाई केल्यानंतर शिंदे गटात येण्यास इच्छुक असलेल्या संजय निरुपम यांची नावे या मतदारसंघासाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. मात्र या दोन्ही संभाव्य उमेदवारांच्या नावांना मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी विरोध केला होता. एक्सवर आपली भूमिका मांडताना शालिनी ठाकरे यांनी ‘मनसे’ला ‘धनुष्य बाण’ चिन्हावर लढायला सांगणाऱ्यांवर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राज ठाकरे यांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. मात्र इकडून तिकडून पालापाचोळ्यासारखा उडत आलेल्या महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रवींद्र वायकरसारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठिंबा गृहित धरू नये, असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला होता.
त्यावर आता मनसेने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. शालिनी ठाकरे यांची विधाने पूर्णपणे अप्रस्तुत आहेत. ती त्यांची व्यक्तिगत मते आहेत. त्यामुळे माध्यमांनी ही पक्षाची भूमिका म्हणून पाहू नये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांशीच संवाद साधण्यात यावा. पदाधिका-यांनीही याची गंभीर नोंद घ्यावी, असे पत्रक मनसे नेते शिरीष देशपांडे यांनी काढले आहे.