सांगली
लोकसभेच्या (Sangli Loksabha) जागा वाटपात सांगलीच्या जागेवर दिल्लीपर्यंत चर्चा झाली, सोनियाजी गांधी यांनीही यावर चर्चा केली. सांगली (sangli) जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना व दुःख समजतो, तुमच्या भावनांचे चीज करू, काँग्रेसचे कुटुंब एकसंध राहिले पाहिजे, तुमच्या वेदनांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु आता मशाल पेटवायची आहे. सांगली काँग्रेसला (Sangli Congress) ज्यांनी दृष्ट लावण्याचे काम केले त्याची दृष्ट उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजची लढाई वेगळी आहे, देशावर मोठे संकट आहे, चुकून जर मोदी सरकार पुन्हा आले तर भविष्यात निवडणूक होणार नाही. मोदी सरकारने १० वर्षात विरोधी पक्षांना प्रचंड त्रास दिला. सोनियाजी गांधी यांना ईडी कार्यालयात तासनतास बसवले, राहुल गांधी यांनाही ईडी कार्यालयात चौकशीच्या नावाखाली पाच दिवस १०-१० तास बसवले अशा मोदी सरकारला माफ करणार आहात का? सोनियाजी गांधी यांनी देशासाठी कपाळाचे कुंकू दिले, देशाच्या एकात्मतेसाठी त्यांनी पंतप्रधानपदही नाकारले हे लक्षात ठेवले पाहिजे.
यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, २०१४ नंतर आलेले भाजपचे सरकार वेगळ्या वाटेवर गेले, पुढच्या कालखंडात लोकशाही, राज्यघटना राहणार का बदलणार? देश वेगळ्या वळणावर जाईल का? अशी ही ऐतिहासिक निवडणूक आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे, राज्यघटना पायदळी तुडवली, मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले. निवडणुका लागल्यानंतर काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवली. देशातील राजकीय परिस्थितीचा विचार करुन विरोधी पक्ष एकत्र आले व इंडिया आघाडीची स्थापना केली. राज्यातही महाविकास आघाडी स्थापन करून एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहे. पहिल्या टप्प्यातील चित्र सकारात्मक दिसले आहे, भाजपला रोखणे हे आपले लक्ष्य आहे. तीन पक्षांच्या जागा वाटपाचे काम सोपे नव्हते. सांगलीच्या जागेसाठी सर्व बाजूंनी दबाव होता, खूप चर्चा झाली. सांगलीच्या जागेसाठी दिल्लीतूनही प्रयत्न केला परंतु यश आले नाही. भाजपला हद्दपार करण्याच्या उद्देशाने आघाडी म्हणून साथ दिली पाहिजे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, भाजपच्या हाती सत्ता जाऊ नये म्हणून २०१९ साली तीन पक्षांचे आघाडी सरकार स्थापन करण्यात आले. सरकार चांगेल काम करत होते नंतर शिवसेना पक्ष फोडला, आमदार खरेदी केले, पदांचे आमिष दाखवले, साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर सर्वोच्च पातळीवरून झाला. महाराष्ट्रातील या तोडफोडीला नरेंद्र मोदी यांचा राजश्रय होता, त्यांच्या संमतीनुसार हे घडले, हा सर्वात मोठा राजकीय भ्रष्टाचार आहे.
निवडणुकीत विरोधकांची फाटाफूट झाली की भाजपाचे फावते म्हणून विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. काहीही झाले तरी राज्यात मविआ व देशात इंडिया आघाडीचा विजय झालाच पाहिजे, नाहीतर पुढच्या पिढीचा शाप लागेल. राज्यात मविआ व दिल्लीत मोदींचा पराभव करुन इंडिया आघाडीचे सरकार येईल. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध व ताकदवर राहिली पाहिजे व मोदींचा पराभव झाला पाहिजे हे दुहेरी आव्हान पेलावे लागणार आहे व आपण हे इंद्रधनुष्य पेलाल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
या मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विक्रम सावंत, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्ह्याचे निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.