23.1 C
New York

Loksabha Elections : राज्यात उद्या आठ जागांसाठी मतदान; कोणते उमेदवार आहेत रिंगणात?

Published:

मुंबई

उद्या 26 एप्रिल रोजी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात आठ मतदारसंघातील मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या जागांवर मतदान होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश मिळून 88 लोकसभा मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, काँग्रेस नेता राहुल गांधी, शशी थरूर, अभिनेत्री हेमामालिनी, रामायण मालिकेतील राम अरूण गोविल तर महाराष्ट्रातील अकोल्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्यासह 1,206 उमेदवार मैदानात आहेत.

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र आहे. 8 पैकी 3 जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत आहे. 8 जागांसाठी 204 उमेदवार रिंगणात आहेत. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा जागांसाठी 26 एप्रिलला मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पूर्ण करण्यासाठी आठही जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या उद्याच्या दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये 37 उमेदवार आपलं भाग्य आजमावत आहे. त्याखालोखाल परभणीत 34, हिंगोलीत 33, वर्धामध्ये 24, नांदेडमध्ये 23, बुलढाणामध्ये 21, यवतमाळ-वाशीम मतदारसंघात 17 आणि अकोलामध्ये 15 अशी मतदारांची संख्या आहे.

आठ मतदार संघात अशी होणार लढत

हिंगोली
हिंगोलीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिली आहे.

परभणी
महायुतीत सहभागी झालेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या विरोधात परभणी लोकसभा मतदारसंघातून लढत आहेत.

नांदेड
नांदेडमध्ये भाजपचे विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर हे काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या विरोधात आहेत.

बुलढाणा
शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत.

यवतमाळ-वाशीम
शिवसेने शिंदे गटाच्या वतीने राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना ठाकरे गटानं संजय देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

अकोला
अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत आहे.

अमरावती
अमरावतीत भाजपाचे उमेदवार खासदार नवनीत राणा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे बळवंत वानखडे तर दिनेश बुब हे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवारही रिंगणात आहेत.

वर्धा
वर्ध्यात भाजपाचे विद्यमान खासदार रामदास तडस आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणारे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यात सरळ लढत होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img