लखनऊ
काँग्रेसचे थिंक टँक समजले जाणारे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी ‘वारसा कर’ (inheritance tax) बाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी सॅम पित्रोदा यांच्या ‘वादग्रस्त’ विधानावर जोरदार हल्ला चढवल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या (BSP)अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती (Mayavati) यांनी देखील काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे.
मायावतींनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारतातील संपत्ती वितरणाच्या नावाखाली काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची कल्पना आणि अमेरिकेसारख्या खाजगी मालमत्तेवर ‘वारसा कर’ लावण्याचा विचार गरीबांच्या कल्याणासाठी कमी आणि त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अधिक प्रेरित आहे. ‘गरिबी हटाव’ हे सरकारच्या बहुचर्चित अपयशावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा एक निवडणूक प्रयत्न असल्याचे दिसते. त्यांनी पुढे लिहिले की, काँग्रेसच्या कार्यकाळात भारतातील मालमत्ता आणि सरकारी जमिनीच्या वितरणाशी संबंधित प्रकरणांमध्ये दलित आणि वंचितांना न्याय मिळण्याबाबत, गरिबी, मागासलेपणा, स्थलांतराची सक्ती इत्यादी गोष्टी योग्य हेतूंच्या अभावामुळे दूर होऊ शकल्या नाहीत. अशा कलंकित वारशातून काँग्रेसला मुक्त होणे कठीण आहे, अशी टीका मायावती यांनी केली.
काय म्हणाले सॅम पित्रोदा?
अमेरिकेच्या ‘हेरिटन्स टॅक्स’ पद्धतीचा उल्लेख करताना सॅम पित्रोदा म्हणाले, “अमेरिकेत वारसा कर आहे. जर कोणाकडे $100 दशलक्ष संपत्ती असेल आणि तो मरण पावला तर त्यातील केवळ 45 टक्के रक्कम त्याच्या मुलांकडे जाऊ शकते. उर्वरित 55 टक्के मालमत्ता सरकारकडे जाते, ते पुढे म्हणाले, “भारतात असा कोणताही कायदा नाही. जर एखाद्याची संपत्ती 10 अब्ज असेल आणि तो मेला तर त्याच्या मुलांना 10 अब्ज मिळते, जनतेला काहीच मिळत नाही… लोकांनी अशा विषयांवर चर्चा करणे आवश्यक आहे.