23.1 C
New York

Election Commission : नरेंद्र मोदी, राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस

Published:


नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाषणांची निवडणूक आयोगाने (Election Commission) गांभीर्याने दखल घेतली आहे. आयोगाने आचारसंहितेचे (Code of Conduct) उल्लंघन केल्याच्या ठपका ठेवत दोघांनाही नोटीस जारी केली आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांकडून 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तरे मागवली आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या. लोकांमध्ये द्वेष पसरवल्याचा आणि धर्म, जात, पंथ आणि भाषेच्या नावाखाली फुटीरतावादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला होता. यावर निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ मधील अधिकारांचा वापर करून पक्षाध्यक्षांना स्टार प्रचारकांच्या वर्तनासाठी जबाबदार धरले असून, दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना नोटिसा बजावल्या आहेत. निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, राजकीय पक्षांना त्यांचे उमेदवार आणि स्टार प्रचारक यांच्या वर्तनाची जबाबदारी घ्यावी लागेल. विशेषत: निवडणूक प्रचारादरम्यान उच्च पदांवर असलेल्या लोकांची अशी भाषणे अधिक चिंताजनक आहेत. त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
नरेंद्र मोदींच्या राजस्थानमधील भाषणावरुन वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच राजस्थानमधील एका सभेत सांगितले होते की, काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या मालमत्तेचे वाटप घुसखोर आणि जास्त मुले असलेल्यांमध्ये करेल. यावेळी पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ दिला होता, ज्यात मनमोहन सिंग म्हणाले होते की देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याक समुदायाचा पहिला हक्क आहे. या प्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला आवाहन केले होते की, पीएम मोदींचे वक्तव्य फुटीर आणि द्वेषपूर्ण असून ते आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे. काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे 17 तक्रारी केल्या आहेत.
भाजपने राहुल गांधींचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे
भाजपनेही 22 एप्रिल रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. भाजपने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, राहुल गांधी देशातील गरिबी हटवण्याचे खोटे आश्वासन देत आहेत. राहुल गांधी यांनी भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर देशात फूट पाडण्याचा आणि निवडणुकीचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img