मुंबई
महाराष्ट्रातील फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधून भाजपात (BJP) घरवापसी करणार असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र पंधरा दिवस उलटून देखील अद्यापही खडसे यांचा प्रवेश करण्यात आला नसल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहे. खडसे यांनी पंधरा दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असे वक्तव्य केले होते. मात्र खडसे यांच्या या प्रवेशाला राज्यातील तीन महत्त्वाचे नेते यांनी ब्रेक लावला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर आपण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत. कोणत्याही अटीशर्ती शिवाय मी प्रवेश करणार आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.
एकनाथ खडसे हे भाजपचे जेष्ठ नेते होते. 2014 मध्ये राज्यात भाजपची सत्ता येणार होती त्यावेळी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले खडसे यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. तेव्हापासूनच एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय वाद सुरू आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री असताना यांच्यावर दाऊद इब्राहिम आणि जमीन घोटाळ्यातील आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद सातत्याने समोर येत होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. मात्र आता पुन्हा भाजपात घर वापसी करणार असल्याचे वक्तव्य खडसे यांनी केले होते. मात्र राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमुळे एकनाथ खडसे यांचा भाजपमधील घरवापसीला ब्रेक लागले आहे.
एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील नेते आहे. जळगाव मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचा स्थानिक वाद मोठ्या प्रमाणात आहे. एकनाथ खडसे यांचा भाजप मधील घर वापसी संदर्भात केलेल्या घोषणेनंतर गिरीश महाजन यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे राजकीय जाणकारांच्या मते एकनाथ खडसे यांच्या घरवापसीला देवेंद्र फडणवीस ग्रुप कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.
निवडणूक काळात खडसेंना भाजपमध्ये घेतले तर स्थानिक पातळीवर गटातटाचे राजकारण ढवळून निघेल. त्यामुळे निवडणुकीनंतर घेऊ, अशी काही नेत्यांची भूमिका असल्याचे समजते. जर परत केंद्राकडून विचारणा झाली तर खडसेंचा प्रवेश निवडणूकीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेशाला नक्की मुहूर्त कधी लागणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.