हैदराबाद
भारतात सध्या प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट (Heat Wave) आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी लोक नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. उन्हाळ्यात चार भिंतींच्या आत एसीमध्ये बसायला मिळेल अशा अनेक जॉब प्रोफाईलसाठी (Job Profile) लोक प्राधान्य देत असतात, मात्र काहींना फील्ड वर्कशिवाय पर्याय नसतो. विशेषत: पोलीस खात्यातील लोक ज्यांना कडक उन्हातही आपले कर्तव्य बजावावे लागते. अशीच भर उन्हात कर्तव्य पार पडण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर (Trafic Police) असते, जे कडक उन्हातही आपले कर्तव्य बजावत लोकांना वाहतुकीचे नियम पाळायला लावतात. आता अशा वाहतूक पोलिसांसाठी खास हेल्मेट (AC Helmet) आणण्यात आले आहे, ज्यात एसी आहे, ज्यामुळे त्यांना कडक उन्हात दिलासा मिळेल. तुम्हाला या हेल्मेट्सबद्दल माहिती आहे का?
एसी हेल्मेट तेलंगणाच्या येथील हैदराबाद जार्च सेफ्टी या स्टार्ट-अपने बनवले आहे. कूलिंग हेल्मेट इनबिल्ट एसीसह येतात. या हेल्मेटचे वजन सामान्य हेल्मेटपेक्षा निम्मे आहे, केवळ 200 ग्रॅम इतकेच त्याचे वजन आहे. उन्हाळाच्या परिस्थितीत हे हेल्मेट परिधान करणाऱ्यांना खूप दिलासा देते. हे हेल्मेट वापरणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअसने कमी होण्यास मदत होऊ शकते, असा दावाही कंपनीने केला आहे. हे हेल्मेट रिचार्ज करण्यायोग्य असून लि-आयन बॅटरीवर चालते. चार्जिंगनंतर सलग 10 तास या हेल्मेटमधील एसी कार्यरत राहतो.
हेल्मेटची किंमत किती?
वाहतूक पोलिसांसाठी असलेल्या या विशेष हेल्मेटची किंमत 13,000 ते 17,000 रुपयांपर्यंत आहे. हेल्मेट हे इतरांसह ISO आणि OHS द्वारे प्रमाणित आहे. त्याचा कमी-पॉवर ऍप्लिकेशमुळे शॉर्ट-सर्किटचा धोका नाही. हे हेल्मेटमध्ये व्हेंट्स आहेत ज्यातून थंड हवा वाहते. यात डोळ्यांचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करणारी उपाययोजना देखील आहे. गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशातील हजरतगंज अटल चौक चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना असे किमान चार हेल्मेट देण्यात आले. महिनाभराच्या चाचणीनंतर उत्तर प्रदेश पोलीस आणखी आणखी ५०० हेल्मेट खरेदी करणार आहे.