मुंबई
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत (Pravin Raut) यांची ईडीने (ED) मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Land Scam) प्रकरणात 73 कोटी 62 लाखाची मालमत्ता जप्त केली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती. सध्या जामीनावर बाहेर आहे. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत 116 कोटी 27 लाख रुपयांची मालमत्ता जप्त (Property seized) करण्यात आली आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्यात ईडी कडून संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना यापूर्वी अटक केली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या या दोन्हीही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. लोकसभा निवडणूक सुरू असताना ईडी कडून करण्यात आलेली कारवाई वरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.
पत्राचाळ घोटाळा प्रकरण नेमकं आहे काय?
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली. मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.