हिंगोली
राज्यातील सत्तांतरामुळे भ्रमिष्ट आणि सैरभैर झालेले आता बेछुट आरोप करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे पितापुत्रांवर केली. आमचा राजकारणातील जेवढा अनुभव आहे तेवढे तुमचे वय देखील नाही तरीही आरोप करत आहात, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना काढला.
हिंगोली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
हिंगोलीत बाबुराव कदम या सर्वसामान्याला संधी दिली, हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे. राज्याच्या विकासासाठी अनेक निर्णय घेतले. हे सरकार अहोरात्र काम करणारे सरकार आहे. राज्यात काही भागात गारपीट, अवकाळी पाऊस सुरु आहे. निवडणूक असली तरी शेतकऱ्यांचे नुकसान भरून देण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शासनाने आतापर्यंत 15 हजार कोटी रुपये नुकसान भरपाई दिली असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
विरोधांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ज्यांचे वय नाही ते आता सैरभैर होऊन आरोप करत आहेत. सत्ता गेल्याने ते भ्रमिष्ट झाले आहेत. मला नीच म्हणाले. एका शेतकऱ्याच्या मुलाला शिवी दिली. हा मराठा समाजाचा अपमान आहे. त्याचे उत्तर हा समाज मतपेटीतून देईल, असे ते म्हणाले.
संविधान बदलणार या भूलथापा सुरु आहेत. संविधान कुणी बदलू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बाबासाहेबांचा अपमान काँग्रेसने केला. त्यांचा निवडणुकीत परभाव केला. त्यामुळे काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की मराठा आंदोलनाला मूका मोर्चा अशी ज्यांनी टिंगल केली ते महाविकास आघाडीत आहेत. मात्र आम्ही मराठा समजाला 10 टक्के आरक्षण दिले आणि ते कायद्याच्या चौकटीत टिकवून दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
विरोधकांकडून मुस्लिम समाजाला घाबरवले जात आहे. मात्र माझे जिवाभावाचे कार्यकर्ते हे मुस्लिम बांधव आहेत. माझ्या गाडीचे सारथी मुस्लिम आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मुसलमानांना मिळतो. काँग्रेसने मुस्लिम आणि दलितांना केवळ व्होट बँक म्हणून वापरले. आम्ही प्रत्येक समाजाला गुणगोविंदने सोबत घेऊन पुढे जात आहोत, असे त्यांनी सांगितले.