पेण
पेण तालुक्यातील (Pen) आगरी समाज हॉल येथे महायुतीची भव्य जाहीर सभा पार पडली. या मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली. या सभेवेळी महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या सभेला संबोधित करतांना सुनिल तटकरे यांनी जिल्ह्यातील विकास कामावरील पुढील ५ वर्षांचा रोडमैप मतदारांसमोर सादर केला. सर्वधर्म समभाव राखला जावा म्हणून काम करण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. अनेक वर्षाचा धार्मिक सलोखा राखण्याचे काम केले आहे. नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री असताना मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला निधी वाढवण्याचा प्रस्ताव दिला परंतु त्याकाळच्या मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव मंजूर केला नाही. परंतु एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी निधी वाढवून दिला. आम्ही धार्मिक सलोखा निर्माण केला आहे त्यामुळे मुस्लिम समाज आपल्या पाठीशी उभा राहणार आहे. ज्यांनी मला निवडणुकीत मदत केली त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे. आता घड्याळ चिन्हावर मला निवडून आणलत तर त्याची परतफेड म्हणून या पेण मतदारसंघातील युतीचा जो आमदार असेल तो सर्वाधिक मताधिक्य देऊन निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो, असे सुनिल तटकरे यांनी आवाहन केले.
जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटना बदलली जाणार नाही. मात्र, आता निवडणुकीत बाबासाहेबांनी लिहिलेली घटना बदलणार, असा आभास निर्माण केला जात आहे. आता तुम्हाला निवडणुकीत संविधानाची आठवण येते का? पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. मात्र, कुणी जाणीवपूर्वक बदनाम करत असेल तर मला त्यांचे सत्य सांगावे लागेल.
या सभेवेळी पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पेण रेल्वे स्थानकाचा प्रश्न उपस्थित केला. यावर बोलतांना तटकरे यांनी सांगितले की, पेणपासून सीएसटीपर्यंत लोकल सुरु करण्याची जबाबदारी आता मी घेतली आहे. पेणच्या या लोकलमुळे पेण तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. तसेच सन २०५० पर्यंत पेणच्या लोकसंख्येचा विचार करून पिण्याच्या पाण्याची तरतूद केली जाईल. आचारसंहिता लागू आहे याचे भान मला आहे पण तुमच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विलंब लागणार नाही.
देशात ‘नमो नारी शक्ती’ अभियान सुरू झाले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अदितीने चौथे महिला धोरण राज्यातील महिलाशक्तीसाठी जाहीर केले आहे. या सरकारने मातृशक्तीचा सन्मान केला आहे. या मातृशक्तीच्या माध्यमातूनच पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणून नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करायचे आहे, असे आवाहन तटकरे यांनी यावेळी केले.
महिलांना संसदेत व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण काँग्रेसने दिले नाही, मात्र नरेंद्र मोदी यांनी आरक्षण देऊन ही किमया केली आहे. अनेक क्रांतिकारी निर्णय मोदींनी घेतले आहेत. सूक्ष्म-लघू उद्योगातून ३३ टक्के सबसिडी महिलांना मिळते. बचत गटांना फिरता निधी ३० हजार रुपयांचा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला, अशी माहितीही यावेळी महिलांना दिली.
पेण तालुक्यातील गावाखेडयात ४जी आणि ५जी नेटवर्क उभे केले जाईल. जगाच्या पाठीवर गणपतीच्या मूर्ती तयार करणारे एकमेव पेण हे शहर आहे. श्री गणेश मूर्तीबाबत पर्यावरण विभागाने काही अटी टाकल्या आहेत. हा प्रश्न लोकसभेत सोडविण्याचा प्रयत्न करेन. तसेच वसई विरार कॉरिडोअर झाल्यानंतर पेण ला त्याचा लाभ होणार पण त्या वेळेला भूमिपुत्रांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. मतदाराच्या रुपाने मी पेणकर असल्याने या शहराचा कालबद्ध पध्दतीने विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे असे आश्वासन सुनिल तटकरे यांनी जनतेला दिले.
या मतदारसंघातील कालबद्ध पध्दतीने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.घड्याळाला मत म्हणजे राष्ट्रहिताला मत… घड्याळाला मत म्हणजे मोदीजींना मत. घड्याळाला मत म्हणजे तटकरेंना मत. हे घराघरात जाऊन सांगावे लागेल असे उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले.
या जाहीर सभेला आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, पेण नगरपालिका अध्यक्ष प्रितम पाटील, मंगेश नेने, भाजप शहर प्रमुख हिमांशु कोठारी, वैकुंठ पाटील, गट नेता अनिरुद्ध पाटील, दीपक गुरव, आजी माजी नगरसेवक आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.