अरविंद गुरव/पेण
उष्णतेचा पारा (Heat wave) वाढत आहे. रायगड जिल्ह्यात कमाल तापमान ४० ते ४२ दरम्यान जात आहे. घराबाहेर पडताच घामाच्या धारा लागत आहेत. यामुळे आपसूकच पावले रस्त्याच्या कडेला असलेल्या रसवंती गृह, ज्यूस सेंटर तसेच लिंबू सरबतच्या हात गाड्या आणि टपऱ्यांकडे वळतायत; परंतु या पेयामध्ये सर्रासपणे वापरला जाणारा बर्फ जीवघेणा ठरत आहे. पेण शहरात आरोग्यास घातक (Unhealthy Ice) औद्योगिक वापराच्या बर्फाचा (Industrial Ice) वापर मोठ्या प्रमाणात होत असून पेणकरांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू आहे. मागील वर्षभरापासून बर्फ तयार करणाऱ्या या कारखान्याची तपासणी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (Food and Drug) केली नसल्याचे भयानक वास्तव तपासांती समोर आले आहे.
अनेक विक्रेत्यांना कोणता बर्फ खाण्यायोग्य आणि कोणता अयोग्य, याची माहिती नसल्याचे समाेर आले आहे. पेण शहरात रसवंती गृह, ज्यूस सेंटर, आइस्क्रीमच्या हातगाड्या लावलेल्या असतात. यापैकी उसाच्या रसवंतीगृहांची संख्या जास्त आहे. तसेच परप्रांतीय उसाचे गुऱ्हाळ घेऊन खेडेगावात आणि आदिवासी पाड्यांमध्ये फिरत असतात. हे रसवाले उसाच्या रसामध्ये खाण्यायोग्य नसलेल्या बर्फाचा सर्रास वापर करत आहेत. या फेरीवाल्यांकडे अन्न औषध प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शहरी भागात उन्हाच्या चटक्यामुळे काेरडा पडलेला घसा थंड करण्यासाठी नागरिक रसवंतीगृहामध्ये येतात; परंतु हा बर्फ ज्या कारखान्यातून खरेदी केला जातो, ताे स्वच्छ पाण्यापासून तयार केलेला आहे की नाही? याची मात्र तपासणी हाेत नाही. त्याचबराेबर विक्रेते अस्वच्छ पाेत्याखाली ठेवलेला बर्फाचा तुकडा लाेखंडी सळईने काढतात आणि त्या बर्फाचे खडे तुमच्या ग्लासातील पेयामध्ये मिसळतात.
पेण तालुक्यात एकच बर्फ तयार करण्याचा कारखाना आहे. संपूर्ण पेण तालुक्याला या एकाच कारखान्यातून बर्फाचा पुरवठा केला जातो. या कारखान्यातून उद्याेगासाठी वापरला जाणारा बर्फ तसेच खाण्यासाठी वापरला जाणाऱ्या बर्फाचे उत्पादन हाेते. उद्याेगासाठी लागणारा बर्फ हा अन्न पदार्थ साठवणुकीसाठी आणि रासायनिक उत्पादने थंड ठेवण्यासाठी केला जातो. या बर्फासाठी वापरले जाणारे पाणी प्रमाणित नसते. तरीही हाच बर्फ खाण्यासाठीही वापरला जाताे. असे असतानाही औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्यपदार्थ म्हणून विक्री होत आहे.
औद्योगिक वापराचा बर्फ हा खाद्यासाठी लागणाऱ्या बर्फाच्या तुलनेत स्वस्त असतो. रसवंतीगृह चालक या बर्फाचा सर्रास वापरत करतात. येथील बर्फ बनविणाऱ्या कारखान्यांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे परवाने आहेत. परंतु, बर्फ मात्र अखाद्य स्वरूपाचा तयार केला जात असल्याचेही समोर आले आहे.
साथीच्या आजारांना निमंत्रण
औद्योगिक बर्फ खाल्ल्याने घसादुखी, जुलाब, पाेटाचे विकार, इन्फेक्शन हाेतात. दूषित पाण्यातील विषाणू बर्फातून थेट पाेटात जातात. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. तसेच सध्या सगळीकडे लग्न सोहळे आणि हळदीचे मुहूर्त जोरात आहेत. या सोहळ्यांमध्ये तालुक्यातील उपस्थिती लावत आहेत. या सोहळ्यांमधील शीतपेयांमध्ये सर्रास खाण्यालायक नसलेल्या बर्फाचा वापर होत आहे त्यामुळे पेणमध्ये काविळ या रोगाच्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे.
“मनुष्यबळाअभावी आम्ही येथील बर्फ बनविणाऱ्या कारखान्यांची तपासणी करू शकलो नाही. या कारखान्यांच्या मालकांनी बर्फ शुध्द पाण्यापासूनच बनविणे आणि त्याची योग्य वाहतूक करणे बंधकारक आहे. विक्रेत्यांनी या कारखान्यांकडून बर्फ विकत घेताना ताे खाण्याचा बर्फ आहे असे बिल घ्यायला हवे आणि कारखान्यांनीदेखील ते सक्तीने द्यायला हवे. तसेच अखाद्य बर्फ हा निळा रंग टाकून विकायला पाहिजे. बर्फ तपासणीची लवकरच माेहीम सुरू केली जाणार आहे.” – मारुती घोसलवाड़, सहाय्यक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन – रायगड विभाग