मुंबई
शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर (Viond Ghosalkar) यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात घोसाळकर कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासाबाबत गंभीर आरोप केले होता. या प्रकरणाचा योग्य तपास होत नसल्याचे दिवंगत अभिषेक गोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर (Tejaswini Ghosalkar) यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Courts) तेजस्वी घोसाळकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने मुंबई पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिले आहे.
दिवंगत अभिषेक गोसाळकर यांची काही दिवसांपूर्वी दहिसर परिसरातील एका व्यक्तीने फेसबुक लाईव्ह करत हत्या केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली होती. तसेच मुंबई पोलिसांकडून करण्यात येत असलेला तपास हा योग्य दिशेने होत नसल्याची खंत देखील व्यक्त करण्यात आले होते. मुंबई पोलिसांना निर्देश देण्यात यावा याकरिता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचीकावर आज सुनावणी दरम्यान न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणात सखोल तपास करण्याचे निर्देश दिले आहे.
उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास सर्व बाजूंनी करणे आवश्यक आहे. त्यासाठी घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. आता या प्रकरणात पुढील सुनावणी 6 मे रोजी होणार आहे.
तेजस्वी घोसाळकर या दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक होते. काही महिन्यांपूर्वी अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर त्यांना गंभीर जखमी अवस्थेतल्या अभिषेक घोसाळकरांना दहिसरच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस नोरोन्हा यानंही स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिसनं अभिषेक घोसाळकरांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. दरम्यान, आता उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई पोलिस पुढील सुनावणीत न्यायालयात काय भूमिका मांडणार, हे पाहावे लागेल.