मुंबई : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पक्षात घेऊन फायदा तर होणार नाहीच उलट तोटाच होईल, असा सूर राज्यातील भाजप (BJP) नेत्यांनी आळवल्याने खडसे यांचा भाजप प्रवेश रखडलाय. खडसे यांना भाजपमध्ये घेऊ नये, म्हणून राज्यातील काही नेते दिल्लीत तळ ठोकून होते. त्यामुळे खडसेंची अवस्था आता ‘ना इकडे ना तिकडे’ अशी झाली आहे.
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही भाजपने त्यांची सून रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. खडसे यांनी रक्षा यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास साफ नकार दिला. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार, अशा चर्चा सुरु झाल्या. खडसे यांनीही दहा – बारा दिवसांपूर्वी पत्रकार बैठक घेऊन आपण भाजपमध्ये जाणार असल्याचे जाहीर केले. पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून येत्या १५ दिवसांत आपला पक्षप्रवेश होईल, असेही खडसे यांनी स्पष्ट केले होते. पण, गेल्या दहा दिवसांत काहीच हालचाली झाल्या नाहीत की खडसेंच्या प्रवेशाला राज्यातील भाजपच्या एकही नेत्याने पुष्टी दिली नाही.
आणि आता तर राज्यातील नेतेच खडसेंच्या प्रवेशाला विरोध करत असल्याचे समोर आले आहे. खडसे यांचे जळगावमधील अंतर्गत विरोधक गिरीश महाजन यांनीही यावर भाष्य केले होते. एकनाथ खडसे हे विझलेला दिवा आहेत, असे महाजन म्हणाले होते. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार भाजपचे राज्यातील नेते रक्षा खडसे यांना निवडून आणण्यासाठी मदत करायला तयार आहेत, मात्र खडसेंना पक्षात घेण्यास त्यांचा विरोध आहे. खडसे यांनी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील नेत्यांनी खडसेंच्या प्रवेशाचा पक्षाला काहीही फायदा होणार नाही, हे दिल्लीश्वरांना पटवून देण्यासाठी सरसावले आहेत.