नाशिक
लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काही दिवसापूर्वी निवडणूक न लढवण्यासंदर्भात घोषणा केली होती. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा सुटला असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता पुन्हा आज छगन भुजबळ यांनी दावा कायम असल्याचं वक्तव्य प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया चौथ्या टप्प्यात पार पडणार आहे. मतदान प्रक्रियेला औदे काही दिवस शिल्लक असताना तरी देखील अद्यापही नाशिक लोकसभा मतदारसंघात संदर्भात माहिती सुटण्याचं नाव घेत नाही आहे. छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर या मतदारसंघात भाजपच्या वतीने हा मतदारसंघ आपल्याला मिळावा याकरिता वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू केली होती. या मतदारसंघात विद्यमान खासदार शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे देखील इच्छुक आहे. मात्र भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचे मानलं जात होतं. मात्र आज छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानी झालेल्या समता परिषदेच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये उभे रहावे अशी विनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्यानंतर छगन भुजबळ यांनी पुन्हा या मतदारसंघावर दावा केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा मी आदर करतो. मात्र राजकारणात विविध विषय समोर येत असतात. आता मी निर्णय घेतला आहे. आयुष्यात एकदाच तिकीट मागितले. त्यानंतर माझ्यावर तिकीट मागण्याची वेळ आली नाही. यावेळी त्यांनी दिल्लीतून सांगितले म्हणूनच मी तयारीला लागलो होतो. मात्र त्यांच्याही पुढे काही अडचणी आल्या असतील. त्यामुळे नाशिकचा तिढा सुटत नाहीये असे भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले, तसेच आमचा नाशिकच्या जागेवर दावा अद्यापही कायम आहे. नाशिकसाठी आमच्याकडे खूप उमेदवार तयार आहेत. कारण आमचे लोक सातत्याने काम करत असतात. मात्र कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय लवकर झाला पाहिजे. भाजप आणि शिंदेंकडे देखील अनेक इच्छुक उमेदवार आहेत. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून मी जो कोणी उमेदवार असेल त्याच्या प्रचारासाठी मी काम करणार असे विधान भुजबळांनी केले आहे.