अमरावती
लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातून कट्टर विरोधक असलेले खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि बच्चू कडूंच्या (Bachchu Kadu) प्रहार पक्षाचे दिनेश बूब यांच्या प्रचारसभांवरुन रवी राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले आहेत. सभेच्या मैदानावरुन आमदार बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये मंगळवारी बाचाबाची झाली.
अमरावतीत वातावरण तापलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. प्रहारकडून सायन्स कोर मैदान हे 23 आणि 24 एप्रिलसाठी आरक्षित करण्यात आलं होतं. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या सायन्स कोर मैदानावर सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांची उद्या सायन्स कोर मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 23 आणि 24 एप्रिलला प्रहार पक्षाला असलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शहा येणार असतील तर 24 तासांआधी सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागते, अशी भूमिका पोलिसांची आहे. पण यामुळे बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदानावर ठिय्या मांडला आहे. अमित शहा यांच्या सभेला परवानगीची गरज नाही. सुरक्षेचं कारण सांगून तुम्ही आमच्या सभेला परवानगी कशी नाकारता? असा प्रश्न बच्चू कडू यांना उपस्थित केला. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना भाजपचा दुपट्टा गळ्यात घालण्याचा सल्ला दिला. यावेळी पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली.
दरम्यान, आता याच मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. त्यामुळे भाजपने सभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आपल्याला सभेची परवानगी मिळालेली असताना मैदानावर भाजपचा हस्तक्षेप कसा, हे पाहण्यासाठी गेल्यानंतर आमदार बच्चू कडूंना पोलिसांनी अडवले. त्यानंतर कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.