26.6 C
New York

Gulkand : उन्हाळ्यात गुलकंदचे सेवन केल्याने होऊ शकतात ‘हे’ फायदे!

Published:

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता ही वाढत असल्यामुळे उन्हाळा असह्य होऊ लागला आहे. यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशांतील तापमान ५० अंश सेंटिग्रेड पर्यंत जाण्याची शक्यता आहे. परिणामी उन्हाळ्यातील आजार ही वाढू लागले आहेत. उन्हाळ्यात सामान्यतः आम्लपित्त, पोटातील व्रण , शौचास साफ न होणे, अपचन, पोटाचे विकार,नाकातून रक्त येणे (घोळणा फुटणे), चक्कर येणे, उष्माघात,गळवे-कांजण्या- घामोळे- खाज इ.त्वचा विकार,दाह(अंगाची आग होणे-विशेषतः हातापायांची)’तोंड येणे, पित्ताचा त्रास,रक्त स्त्राव अधिक होणे विशेषतः स्त्रियांमध्ये,मानसिक
ताणतणाव, नैराश्य, थकवा येणे, डोळ्यांची जळजळ होणे, वारंवार तहान लागणे इ.आजार प्रामुख्याने होत असतात. या सर्वांवर गुलकंद अत्यंत उपयोगी आहे. या व या सारख्या उन्हाळ्यातील बऱ्याच आजारांवर उपयोगी आहे तो गुलकंद, (Gulkand) जो शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करून शरीर थंड ठेवण्याचे काम करतो. शरीरातील दाह कमी करतो. गुल म्हणजे फुल व कंद हा शब्द खडीसाखरेवरून आला असावा.

गुलकंद कसा तयार करतात?

हा एक अवलेहाचाच प्रकार आहे,जसा च्यवनप्राश. गुलकंद तयार करण्याची कृती सोपी आहे. एका काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत खडीसाखरेचा थर व त्यावर गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा थर, याप्रमाणे जितकी फुले अर्थात पाकळ्या असतील तेवढीच खडी साखर घेऊन त्याचे थरावर थर एकावर वर एक याप्रमाणे बरणीत भरावे व बरणीच्या तोंडावर स्वच्छ कपडा बांधून ती बरणी ४० दिवस चांगल्या उन्हांत ठेवावी.
बरणी उन्हांत ठेवल्याने पाकळ्यांतील सर्व पाणी(जल) उडून जाते आणि फुले व खडी साखर एकजीव होऊन गुलकंद तयार होतो. यासाठी देशी व सुगंधी गुलाबाची फुले घेणे चांगले. गुलकंदाला जास्त शीत करण्यासाठी त्यात काही प्रमाणात प्रवाळ भस्म मिसळतात व प्रवाळ मिश्रित गुलकंद तयार करतात. प्रवाळ शीत आहे.प्रवाळ मिश्रित गुलकंद हा साध्या गुलकांदापेक्षा अधिक उपयोगी आहे.

गुलकंद हे एक उत्कृष्ट शक्तिवर्धक “टॉनिक” आहे. यात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.शरीरातील विषद्रव्ये नष्ट करण्याचा गुण गुलकंदात आहे.
वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करून तारुण्य बराच काळ राखण्यासाठी गुलकंद उपयोगी आहे. यांत साखर असल्याने शरीरास ऊर्जा (शक्ती) प्राप्त होते.हा शरिरातील रक्ताचे प्रमाण वाढवून रक्ताची शुद्धीकरण करण्यास मदत करतो.हा उत्कृष्ट “अँटी ऑक्सिडंट ” आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यात अँटी ऑक्सिडंट महत्त्व पूर्ण भूमिका बजावते. अनेक आजारांपासून बचाव करते.

यात जीवनसत्व “ब” प्रमाण आहे. गुलकांदा मुळे मेंदूतील “मेला टोनिन” हॉर्मन्स ला चालना मिळून स्मरण शक्ती वाढण्यास व झोप येण्यास मदत होते.याने शरीरातील चयापचय क्रियेस चालना मिळून ती चांगली होते.शरीर कार्यक्षम रहाते.रक्त दाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. पित्त प्रकृती च्या लोकांसाठी हा विशेष उपयोगी आहे. शरीर व मनाचे उष्णतेपासून रक्षण करण्या बरोबरच ते निरोगी ठेवण्यासाठी हा सर्वांसाठी उपयोगी आहे. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी,शरीर “कूल” ठेवण्यासाठी गुलकंदा चा अवश्य वापर करा.

गुलकंद केवळ उन्हाळ्यासाठीच उपयोगी नाही तर तो नेहमीच उपयोगी आहे.फक्त उन्हाळ्यात जास्त उपयोगी आहे.
सकाळी व रात्रौ एक एक चमचा खावा.(दिवसाला ५ ते २० ग्राम घेण्यास हरकत नाही.) जास्त प्रमाणात घेतला तरी कोणतेही नुकसान होत नाही.
सकाळी रिकाम्यापोटी व रात्री झोपताना घेतल्यास अधिक गुणकारी. फक्त गुलकंद खावा वा दूध व पाण्याबरोबर खावा. नेहमी न्याहारी नंतर सुध्दा एक चमचा घेण्यास हरकत नाही.बरेच वेळा मसाला पानातून आपण गुलकंद खातच असतो.
मधुमेह असलेल्यांनी याचा वापर जपून करावा.

डॉ. अंकुश जाधव
सेवानिवृत्त सहायक संचालक, आयुष मंत्रायल, भारत सरकार

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img