सतरा वर्षांच्या ग्रँडमास्टर डी. गुकेश (D.Gukesh) याने इतिहास रचला आहे. डी. गुकेशने (D. Gukesh) ही स्पर्धा जिंकून सर्वात लहान आव्हानवीर होण्याचा मान मिळवला आहे. जगज्जेत्या बुद्धीबळपटूला आव्हान देणारा खेळाडू निवडण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या कँडिडेटस स्पर्धेत भारताचा 17 वर्षीय ग्रँडमास्टर डी.गुकेश (Gukesh D) याने इतिहास रचला आहे. ही स्पर्धा जिंकून त्याने डिंग लिरेन (चिनी ग्रँडमास्टर) याला आव्हान दिले आहे. डी. गुकेश हा भारताचा दिग्गज बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदनंतर कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धा जिंकणारा दुसरा भरतीय बुद्धीबळपटू ठरला आहे. (D Gukesh Won Chess Candidates 2024 Makes History By Becoming Youngest Ever World Championship Contender) गुकेशने वयाच्या 17 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली आहे आणि यासोबतच रशियन बुद्धिबळपटू गॅरी याचा विक्रम त्यांनी मोडला आहे.
विश्वनाथन आनंदने केले कौतुक
जगविख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून डी. गुकेश (D. Gukesh) याचे अभिनंदन केले आहे. सर्वात लहान आव्हानवीर झाल्याबद्दल तुझे अभिनंदन. आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे. मला वैयक्तिकरित्या तू ज्याप्रकारे खेळलास आणि अवघड परिस्थिती ज्याप्रकारे हाताळलीस, त्या गोष्टीसाठी मला तुझा अभिमान वाटतो या क्षणाचा आनंद घे, अशा आशयाचे ट्विट विश्वनाथन आनंदने केले आहे.
…आणि गुकेश ठरला विजयी
कॅंडिडेट्स स्पर्धेत प्रत्येक सामन्यासाठी खेळाडूला गुण दिले जातात. सामना जिंकला किंवा बरोबरीने सुटला तर त्यानुसार गुणांचे वाटप केले जाते. अंतिम गुणसंख्येनुसार डी. गुकेश (D. Gukesh) ला नऊ गुण मिळाले होते. त्यामुळेच 9 गुणांसह त्याने प्रथम स्थान पटकावले. या स्पर्धेचा विजेता डी. गुकेश ठरला आणि त्या पाठोपाठ नाकामुरा, कारूआना फेबियो इयान नेपोनियाच यांना 8.5 गुण मिळाले आणि ते संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर आले.
गुकेशने गॅरी कास्पारोव्हचा विक्रम मोडला
गुकेशने वयाच्या 17व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली असून तीन दशकांपासून अबाधित असलेला रशियन बुद्धीबळपटू गॅरी कास्पारोव्हचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे. 1884 च्या कॅन्डिडेट्स बुद्धीबळ स्पर्धेत रशियन ग्रँडमास्टर गॅरी कास्पारोव्ह याने वयाच्या २२ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती. . त्यावेळची स्पर्धा जिंकून कास्परोव्हने त्याचाच देशबांधव जगज्जेत्या कारपोव्हला आव्हान दिले होते. या विजयानंतर गुकेश प्रतिक्रिया दिली आहे. “मला खूप आनंद झाला आहे. मी फॅबियो कारुआना आणि इयान नेपोनिआचमधील रोमांचक सामना पाहत होतो. त्याचा मला अंतिम सामन्यात फायदा झाला”, असे गुकेश म्हणाला.