अनेकजण बऱ्याचदा बाजारातून भरपूर भाज्या आणि फळे खरेदी करतात आणि त्यांना बराच काळ ताजे ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. जवळपास सगळेच असे करतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही भाज्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. होय, थंड तापमान आणि आर्द्रतेमुळे अनेक भाज्या लवकर कुजण्यास सुरुवात करतात. ज्यामुळे अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढू शकतो. तर रेफ्रिजरेटरमध्ये कोणत्या भाज्या आहेत ज्या ठेवणे टाळले पाहिजे? तसेच त्या भाज्या योग्यरित्या कशा साठवायच्या हे देखील जाणून घेऊयात.
लोक अनेकदा काकडी फ्रिजमध्ये ठेवतात, परंतु 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात काकडी लवकर खराब होऊ लागते. फ्रिजमध्ये ठेवल्याने ती पिवळी पडू लागते आणि चव खराब होऊ शकते. काकडी नेहमी सामान्य खोलीच्या तापमानावर ठेवावी. तसेच काकडी कधीच टोमॅटो, खरबूज आणि एवोकॅडो जवळ ठेवू नका, कारण ते इथिलीन वायू सोडतात ज्यामुळे काकडी लवकर खराब होऊ शकते.
टोमॅटो
टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव आणि सुगंध कमी होतो. थंड तापमानामुळे त्यांचा पोत देखील बदलतो. टोमॅटो नेहमी थंड पण खोलीच्या तापमानावर ठेला. सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. खोलीच्या तपमानावर साठवलेले टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेल्या टोमॅटोपेक्षा जास्त काळ ताजे राहतात.
कांदे
कांदे कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. ओलाव्यामुळे, कांदे रेफ्रिजरेटरमध्ये लवकर खराब होतात आणि त्यांना बुरशी येऊ लागते. कांदे कोरड्या, थंड आणि हवेशीर जागेत साठवा. योग्यरित्या साठवल्यास, कांदे दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकतात.
बटाटे
कच्चे बटाटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने त्यातील स्टार्च साखरेत रूपांतरित होते. ज्यामुळे त्याची चव गोड होते आणि शिजवल्यावर त्यांचा पोत देखील खराब होतो. बटाटे नेहमी बास्केट किंवा कागदी पिशवीत ठेवा आणि थंडावा असेल अशा जागेत ठेवा.
लसूण
लसूण फ्रिजमध्ये ओलावा लवकर शोषून घेतो आणि रबरासारखा बनतो. तो नेहमी कांद्यासारख्या थंड आणि हवेशीर ठिकाणी पण रुमच्या तापमानावर ठेवा. तसेच, लसूण पॉलिथिनमध्ये गुंडाळून ठेवणे देखील टाळले पाहिजे.
शिमला मिरची
शिमला मिरची फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांचा कुरकुरीतपणा कमी होतो. खोलीच्या तपमानावर ठेवल्याने त्यांचा कुरकुरीतपणा आणि चव बराच काळ टिकून राहते.
अॅव्होकॅडो
अॅव्होकॅडो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याने ते हळूहळू पिकतात, ज्यामुळे ते कमी ताजे राहतात. ते नेहमी खोलीच्या तपमानावर ठेवा जेणेकरून ते नैसर्गिकरित्या पिकतील आणि चवीला चवदार लागतील.
भाज्यांची साठवणूक कशी करावी?
भाज्या नेहमी वेगवेगळ्या कंटेनरमध्ये किंवा बॉक्समध्ये ठेवा. बटाटे आणि कांदे कधीही एकत्र ठेवू नका, कारण बटाट्यांमधून निघणाऱ्या वायूमुळे कांदे लवकर अंकुरतात आणि खराब होऊ लागतात. पॉलिथिनमध्ये भाज्या आणि फळे ठेवणे टाळा. भाज्या स्वच्छ आणि वाळवल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवा.