माझी कमाई थांबलीय, पुन्हा चित्रपटात जाताेय
थिरुवनंतपुरम, केरळमधील त्रिशूर येथील केंद्रीयमंत्री (Central Minister) सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सरकारला धक्का दिला अाहे. ‘माझी कमाई पूर्णपणे थांबली आहे. अशा परिस्थितीत मला पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात जाण्याशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करत मला कधीही मंत्री व्हायचे नव्हते. चित्रपटसृष्टीतच राहायचे होते, असेही सांगितले. राज्यसभेचे खासदार सी. सदानंदन मास्टर यांना त्यांच्या जागी मंत्रीपद द्यावे, असेही त्यांनी सरकारला सूचवले अाहे.
सुरेश गोपी सध्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यटन राज्यमंत्री आहेत. ते म्हणाले, ‘मी ऑक्टोबर २००८ मध्ये भाजपात सामील झालो. जनतेने मला पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून दिले आणि पक्षाला वाटले की मला मंत्री बनवले पाहिजे.’ कन्नूरमधील एका सभेदरम्यान त्यांनी असेही म्हटले की, बरेच लोक शब्दांमध्ये फेरफार करण्यात आणि त्यांचा चुकीचा अर्थ लावण्यात पटाईत आहेत. जेव्हा मी ‘प्रजा’ हा शब्द राज्यातील लोकांसाठी वापरला, तेव्हा एकच गोंधळ उडाला. लोकशाही असेल तर लोकही असतील. अशा परिस्थितीत, या शब्दाचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये,’ असे गाेपी म्हणाले.
१९६५ पासून चित्रपटात –
सुरेश गोपी यांनी मल्याळम व्यतिरिक्त तेलुगू, कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील काम करतात. ते एक पार्श्वगायकदेखील आहेत. त्यांची चित्रपट कारकीर्द दीर्घ आहे. तथापि, त्यांनी २०१६ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी १९६५ मध्ये बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि १९८६ मध्ये त्यांची पहिली मोठी चित्रपट भूमिका साकारली.




